थकबाकीदारांंची यादी लागणार चौकात विटा नगरपरिषदेचा निर्णय : घरपट्टी थकीत असलेल्या ११५ जणांना जप्तीच्या नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 12:10 AM2018-04-01T00:10:59+5:302018-04-01T00:10:59+5:30
विटा : घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकीदार मालमत्ताधारकांच्या नावांची यादी विटा शहरातील चौका-चौकात झळकणार आहे. त्याची अंमलबजावणी दि. १ एप्रिलपासून सुरू करण्याचा निर्णय
विटा : घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकीदार मालमत्ताधारकांच्या नावांची यादी विटा शहरातील चौका-चौकात झळकणार आहे. त्याची अंमलबजावणी दि. १ एप्रिलपासून सुरू करण्याचा निर्णय नगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. दरम्यान, पालिका प्रशासनाने मार्चअखेरपर्यंत कर वसुली युध्दपातळीवर सुरू केली असून, सुमारे ११५ थकीत मालमत्ताधारकांना जप्तीच्या नोटिसा दिल्या आहेत.
विटा नगरपरिषदेने मार्चअखेर घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीचे जवळपास १०० टक्के ध्येय निश्चित केले होते. परंतु, शनिवारी ३१ मार्चअखेर वसुलीला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. थकबाकीदारांनी पालिका कर्मचाऱ्यांना झुलवत ठेवले. त्यामुळे आता प्रशासनाने थकीत मालमत्ताधारकांवर वचक बसविण्यासाठी विविध युक्त्या शोधून काढल्या आहेत. दि. १ एप्रिलपासून थकबाकीदारांची नावे डिजिटल फलकाद्वारे चौका-चौकात लावण्यात येणार आहेत.
विटा नगरपालिका प्रशासनाने मार्चअखेर वसुलीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी गुरुवार, शुक्रवार या सार्वजनिक सुट्टीच्यादिवशीही कार्यालय सुरू ठेवून कर्मचाºयांना वसुलीच्या मोहिमेवर धाडले होते. या दोन दिवसातही चांगला प्रतिसाद मिळाला.
कराच्या रकमेवर २ टक्के व्याज...
पाणीपट्टी थकबाकीपोटी विटापालिकेने ४५ नळकनेक्शन तोडली असून, ११५ मालमत्ताधारकांना जप्तीच्या नोटिसा पाठविल्या आहेत. शहरात सध्या १४ हजार ९१५ मालमत्ताधारक असून, त्यांच्याकडून प्रतिवर्षी ५ कोटी २१ लाख ५२ हजार कर आकारला जातो. त्यापैकी आतापर्यंत ३ कोटी २८ लाख ७४ हजार रुपये जमा झाले आहेत. शहरात ९ हजार ५२० नळ कनेक्शन असून, पाणीपट्टी २ कोटी ८९ लाख ६ हजार रुपये होते. त्यापैकी दि. ३० मार्चअखेर १ कोटी ७४ लाख १७ हजार रुपये जमा झाले आहेत. १ एप्रिल २०१८ पासून थकबाकीदारांना कराच्या रकमेवर २ टक्के व्याज आकारण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली.