विट्यातील ज्येष्ठ उद्योजक प्रतापराव साळुंखे यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2023 11:04 AM2023-10-28T11:04:17+5:302023-10-28T11:05:47+5:30

गोल्ड व सिल्वर रिफायनरी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण भारतातील विविध राज्यात विखुरलेल्या सोने-चांदी गलाई व्यावसायिकांना एकत्रित करून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला.

Veteran entrepreneur Prataprao Salunkhe from vita passed away | विट्यातील ज्येष्ठ उद्योजक प्रतापराव साळुंखे यांचे निधन

विट्यातील ज्येष्ठ उद्योजक प्रतापराव साळुंखे यांचे निधन

दिलीप मोहिते 

विटा
: सांगली जिल्ह्यातील पारे (ता. खानापूर) गावचे सुपुत्र, केरळ राज्यातील ज्येष्ठ सोने-चांदी गलाई उद्योजक आणि ऑल इंडिया गोल्ड व सिल्वर रिफायनरी असोसिएशनचे संस्थापक-अध्यक्ष प्रतापराव (शेठ) महादेव साळुंखे यांचे शनिवारी मध्यरात्री पुणे येथे हृदयविकाराने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते.

प्रसिद्ध उद्योजक प्रतापराव साळुंखे (दादा) यांनी सुरुवातीपासून सोने-चांदी गलाई व्यवसायाला नवी दिशा मिळवून दिली. गोल्ड व सिल्वर रिफायनरी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण भारतातील विविध राज्यात विखुरलेल्या सोने-चांदी गलाई व्यावसायिकांना एकत्रित करून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला. सोने-चांदी गलाई व्यवसायाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी त्यांनी विविध माध्यमातून अखेरच्या श्वासापर्यंत प्रयत्न केले.

सर्वसामान्य लोकांसाठी त्यांनी विटा येथे शिवप्रताप मल्टीस्टेट पतसंस्थेची स्थापना करून गरजू कुटुंबीयांना आर्थिक पाठबळ दिले. आज या संस्थेच्या महाराष्ट्र व कर्नाटकातील अनेक शाखांमधून गरजू लघु उद्योजकांनाही दिलासा देण्याचे काम त्यांनी केले आहे. सार्वजनिक कामात त्यांचा नेहमी सहभाग होता. माजी मंत्री स्व. डॉ. पतंगराव कदम व ज्येष्ठ नेते मोहनराव कदम यांचे व्याही होत. त्यांच्या नेतृत्वाखाली प्रतापराव साळुंखे यांनी खानापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष पद घेऊन तालुक्यात पक्षाची नवी उभारणी केली.
वयाची 83 वर्षे झाली असली तरी त्यांचा सार्वजनिक कामात तितकाच सहभाग होता. तसेच संस्थात्मक कामांवर ही त्यांचे लक्ष होते. सोने-चांदी गलाई व्यवसायिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते आजही काम करीत होते.

शुक्रवारी दुपारी त्यांनी शिवप्रताप पतसंस्थेत येऊन कामकाज पाहिले व त्यानंतर पुणे येथे नेहमीच्या वैद्यकीय तपासणीसाठी भारती हॉस्पिटलला गेले. शनिवारी मध्यरात्री त्यांना हृदयविकाराचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. 

त्यांच्या जाण्याने संपूर्ण खानापूर तालुक्यावरच नव्हे तर भारतभर विखुरलेल्या सोने-चांदी गलाई व्यावसायिकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी सुजाता, मुले सतीश व शेखर, मुली सुनीता कदम, सविता देवकर, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Web Title: Veteran entrepreneur Prataprao Salunkhe from vita passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.