ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक जयराम कुष्टे यांचे निधन; मिरजेत अंत्यसंस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2020 02:29 PM2020-08-23T14:29:06+5:302020-08-23T14:30:10+5:30
जेल फोडण्याच्या घटनेचा अखेरचा शिलेदार हरपला
सांगली : स्वातंत्र्यसंग्रामातील ज्येष्ठ क्रांतिकारी व ब्रिटीश काळात सांगलीचा जेल फोडण्याच्या घटनेतील अखेरचे शिलेदार जयराम विष्णुपंत कुष्टे (वय १0२) यांचे रविवारी सकाळी येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले.
कोकणातल्या राजापूर तालुक्यातील चुना कोळवणमध्ये २४ फेब्रुवारी १९१८ रोजी त्यांचा जन्म झाला. त्याचठिकाणी त्यांचे दुसरीपर्यंत शिक्षण झाले. त्यानंतर तिसरीसाठी त्यांना वेंगुर्ला तालुक्यातील कोंबुरले येथे त्यांच्या बहिणीकडे पाठविण्यात आले. तिसरीतून त्यांनी शिक्षणाला राम राम केला. त्यानंतर सोनारकाम शिकण्यासाठी ते कोल्हापूरला आले. त्याठिकाणी त्यांनी प्रज्ञापरिषदेत सहभाग घेतला. कोल्हापुरातच बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण त्यांनी घेतले. कोल्हापुरातच त्यांची व वसंतदादा पाटील यांची ओळख झाली आणि त्यांच्या कार्याने प्रभावीत होऊन ते सांगलीत आले.
कुष्टे यांनी स्वातंत्र्यसंग्रामात दिलेले योगदान मोठे आहे. १९४२ च्या काँग्रेस अधिवेशनातील ‘करेंगे या मरेंगे’ या घोषणेला मंत्र मानून सांगलीतील ज्या स्वातंत्र्यसैनिकांनी क्रांतिकार्य सुरू केले. त्यातील जयराम कुष्टे हे महत्त्वाचे शिलेदार होते. या क्रांतिकार्यामुळे त्यावेळी काही जणांना अटक झाली होती. त्यात वसंतदादा पाटील, हिंदुराव पाटील, गणपतराव कोळी, जयराम कुष्टे, जिनपाल खोत, सातलींग शेटे, महादेवराव बुटाले, वसंत सावंत, मारुती आगलावे, अण्णासाहेब पत्रावळे, बाबुराव जाधव, विठ्ठल शिंदे, जयराम बेलवलकर, दत्तात्रय पाटील, नामदेवराव कराडकर, कृष्णा पेंडसे, बाबुराव पाचोरे, तात्या सोनीकर यांचा समावेश होता. या स्वातंत्र्यसैनिकांनी २४ जुलै १९४३ रोजी सांगलीचा जेल फोडला होता. यात जयराम कुष्टेही आघाडीवर होते. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील व अन्य सहकाºयांसमवेत त्यांनी या थरारक घटनेत पुढाकार घेतला होता.
क्रांतिवीर नागनाथआण्णा नायकवडी, क्रांतीअग्रणी जी. डी. (बापू) लाड, हुतात्मा किसन अहिर यांच्यासह अनेक स्वातंत्र्यसैनिकांबरोबर त्यांनी काम केले. त्यांना पकडण्यासाठी ब्रिटीश सरकारने बक्षिस ठेवले होते. बारा वर्षे ते भूमिगत राहिले होते. त्यावेळी ते अकलूज येथे शंकरराव मोहिते-पाटील यांच्या वाड्यात वास्तव्यास होते.
स्वातंत्र्यानंतर ते सांगलीतच स्थायिक झाले. सामान्य माणसाप्रमाणे ते आयुष्य जगले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर मिरज-पंढरपूर रस्त्यावरील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.