पशुवैद्यकीय रुग्णालये आता सलग सुरु राहणार,वेळा बदलल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2021 04:08 PM2021-01-05T16:08:05+5:302021-01-05T16:17:16+5:30
Veterinary hospital Sangli- पशुपालकांची गैरसोय टाळण्यासाठी जनावरांच्या रुग्णालयाच्या वेळा बदलण्याचा निर्णय पशुसंवर्धन मंत्रालयाने घेतला आहे. यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आला.
सांगली : पशुपालकांची गैरसोय टाळण्यासाठी जनावरांच्या रुग्णालयाच्या वेळा बदलण्याचा निर्णय पशुसंवर्धन मंत्रालयाने घेतला आहे. यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आला.
नव्या निर्णयानुसार सोमवार ते शुक्रवार या दिवशी पशुवैद्यकीय रुग्णालये सकाळी ९ ते दुपारी ४.३० या वेळेत सलग सुरु राहतील. दुपारी एक ते दिड जेवणाची सुट्टी राहील. शनिवारी सकाळी ८ ते दुपारी १ या वेळेत कामकाज सुरु राहील. आकस्मिक प्रसंगी २४ तास सेवा सुरु राहील असेही स्पष्ट केले आहे. तालुका व जिल्हा स्तरावरील सर्व रुग्णालयांसह फिरत्या पशुवैद्यकीय रुग्णालयांनाही नव्या वेळा लागू राहतील.
यापूर्वी सकाळी ८ ते दुपारी १२ आणि संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत कामकाज चालायचे. हिवाळ्यात सकाळी ८ ते दुपारी १ आणि त्यानंतर ३ ते सायंकाळी ५ या वेळेत उपचार मिळायचे. मधील वेळेत रुग्णालये बंद असल्याने पशुपालकांची गैरसोय व्हायची. जनावरे घेऊन आलेल्या शेतकर्यांना थांबावे लागायचे.
डॉक्टर व कर्मचारीही दिवसभर अडकून पडायचे. उपचारांव्यतिरिक्त बाहेरील कार्यालयीन कामांना वेळ मिळायचा नाही. आता सलग रुग्णालय सुरु राहिल्याने पशुपालक व डॉक्टरांचीही सोय झाली आहे. कार्यालय व रुग्णालयाची वेळ सुसंगत झाली आहे.