Video : विहिरीत पडलेल्या नागाला वाचवलं, सर्पमित्रांची जीवघेणी कसरत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2019 05:40 PM2019-03-17T17:40:01+5:302019-03-17T17:42:01+5:30
इंगरुळ खडी येथील शंकर पाटील यांच्या 50 फूट पायऱ्या नसलेल्या खोल विहिरीत नाग पडला होता.
शिराळा (जि. सांगली) : नागपंचमीसाठी प्रसिद्ध असलेल्या शिराळ्याचे ग्रामस्थ स्वतःचा जीव धोक्यात घालून नागाचे प्राण वाचवतात, असे अनेक प्रसंग घडले आहेत. असाच प्रसंग कापरी-इंगरुळ खडी (ता. शिराळा) येथे आज घडला. पन्नास फूट खोल विहिरीत पडलेल्या नागास शिराळकरांनी जीवदान दिले आहे.
इंगरुळ खडी येथील शंकर पाटील यांच्या 50 फूट पायऱ्या नसलेल्या खोल विहिरीत नाग पडला होता. अमर पाटील यांनी हा नाग पहिला व त्याची माहिती शिराळा येथील शिवछावा स्पोर्ट्स क्लबचे प्रशिक्षक प्राध्यापक सुशीलकुमार जयवंतराव गायकवाड यांना दिली. सुशीलकुमार व धीरज हे जीवाची पर्वा न करता दोरखंडाच्या साहाय्याने विहिरीत उतरूले. तसेच खेळाडू अवधूत पाटोळे, सागर माळी, सौरभ शिंदे तसेच शिवछाया स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडूंनी एका दोरखंडाने प्लास्टिक पोते व काठी विहिरीत सोडली.
जवळजवळ तीन तास अथक प्रयत्न करून हा नाग पकडून पोत्यामध्ये घालून दोरखंडाच्या साहाय्याने विहिरीबाहेर काढला. घटनेची माहिती वनक्षेत्रपाल तानाजीराव मुळीक यांना दिली. त्यानंतर वनपाल सचिन पाटील घटनास्थळी आले. नागास पशुवैद्यकीय दवाखान्यात आणले. त्याठिकाणी डॉक्टरांनी नागाची तपासणी केली. त्यानंतर या नागास सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले. शिराळकरांनी यापूर्वी नांगरट करताना नांगरात अडकून जखमी झालेले, बोअर-विहिरीत अडकलेले, वाहनांच्या धडकेत जखमी झालेले, कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेले अनेक नाग वाचवले आहेत. इतर कोणत्याही ठिकाणी सर्प पहिला की त्यास मारले जाते. मात्र शिराळा येथे सर्प तसेच नागाचा जीव वाचवला जातो. वेळप्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून सापाला वाचवले जाते.
खाऊ घालून सोडले
नाग विहिरीत पडल्याने दोन दिवस उपाशी असावा असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर या सर्व शिराळकरांनी पाहुण्या नागाला वनविभागाच्या अधिकाऱ्यांसमोर खाऊ घालून सुरक्षितस्थळी सोडले.
पाहा व्हिडीओ -
सर्पमित्राने नागाचा जीव वाचवला, जीवघेणा थरारक व्हिडीओ pic.twitter.com/DNR53pAAIv
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) March 17, 2019