Vidhan Sabha Election 2024: शिराळा मतदारसंघात निष्ठावंत गटांची सत्त्वपरीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 06:30 PM2024-11-13T18:30:44+5:302024-11-13T18:31:37+5:30
नाईक व महाडिक यांची भूमिका निर्णायक..
अशोक पाटील
इस्लामपूर : नागभूमी संबोधल्या जाणाऱ्या शिराळा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांच्या लढतीची ऐन थंडीत गरमा-गरम चर्चा सुरू आहे. यावेळच्या निवडणुकीत निष्ठावंत गटांची सत्वपरीक्षाच ठरणार आहे. यामध्ये प्रामुख्याने उमेदवार मानसिंगराव नाईक यांच्याबरोबर माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांचा गट आहे. त्याचबरोबर वाळवा तालुक्यातील ४८ गावांत आमदार जयंत पाटील यांचा गट आहे.
विरोधी भाजपचे उमेदवार सत्यजीत देशमुख यांच्या पाठीशी भाजपचा महाडिक पॅटर्न आहे. त्याच्यासह शाहूवाडी मतदारसंघातील वारणा उद्योगसमूहाचे आमदार विनय कोरे यांनीही देशमुख यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीत संघर्ष उफाळण्याची शक्यता आहे. महायुतीतून हातकणंगले लोकसभा पॅटर्न वापरण्याची तयारी सुरू आहे. याउलट महाविकास आघाडीने मतदारांच्या सोयीचे राजकारण सुरू केले आहे. त्यामुळे शिराळा मतदारसंघातील मतदारांचा भाव चांगलाच वधारणार आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान आमदार मानसिंगराव नाईक यांनी प्रचाराचा धूमधडाका सुरू केला आहे. डोंगरी भागातील बहुतांश ग्रामीण भागाला नाईक यांनी टार्गेट करत सत्यजीत देशमुख यांचा बालेकिल्ला काबीज करण्याची तयारी केली आहे. याउलट सत्यजीत देशमुख यांनी शिराळा शहरासह वाळवा तालुक्यातील ४८ गावांत संपर्क सुरू केला आहे. त्यांच्या साथीला भाजपमधील महाडिक बंधू, सी. बी. पाटील आणि रयत क्रांती शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत आहेत.
वारणा खोऱ्यातील विनय कोरे यांनी भाजपच्या सत्यजीत देशमुख यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे दोन्हीही उमेदवार तोडीस-तोड असल्याची मतदारसंघात चर्चा आहे.
नाईक व महाडिक यांची भूमिका निर्णायक..
सध्या शिवाजीराव नाईक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात आहेत. मानसिंगराव नाईक यांना त्यांची किती साथ मिळते. तसेच, भाजपचे सम्राट महाडिक यांची महायुतीचे उमेदवार सत्यजित देशमुख यांना कशी साथ मिळते. यावर दोन्ही उमेदवारांच्या विजयाचे गणित अवलंबून आहे.