जैन पाठशाळांसाठी विहार धाम बांधणार, महामंडळाच्या बैठकीत निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 18:08 IST2025-01-14T18:08:15+5:302025-01-14T18:08:50+5:30
सांगली : जैन धार्मिक ट्रस्टच्यावतीने चालवण्यात येणाऱ्या जैन पाठशाळांमध्ये प्राकृत, संस्कृत, संगणक शिक्षणासाठी अनुदान योजना सुरू करणार आहे. तसेच ...

जैन पाठशाळांसाठी विहार धाम बांधणार, महामंडळाच्या बैठकीत निर्णय
सांगली : जैन धार्मिक ट्रस्टच्यावतीने चालवण्यात येणाऱ्या जैन पाठशाळांमध्ये प्राकृत, संस्कृत, संगणक शिक्षणासाठी अनुदान योजना सुरू करणार आहे. तसेच जैन साधू-साध्वी यांच्या विहार मार्गामध्ये विहार धाम निर्माण करण्याचा निर्णय जैन आर्थिक विकास महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहिती महामंडळाचे सदस्य रावसाहेब पाटील यांनी दिली.
राज्याचे क्रीडा व अल्पसंख्याक मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक झाली. यावेळी अल्पसंख्याक महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, विभागाचे सचिव रूचेश जयवंशी, उपसचिव मो. बा. ताशिलदार, जैन महामंडळाचे सदस्य रावसाहेब पाटील, सुनील पाटणी, व्यवस्थापकीय संचालक जी. पी. मगदूम, विशेष निमंत्रित संदीप भंडारी, जयेश ओसवाल, नीरव देढीया यांच्यासह उपसचिव विशाखा आढाव व अन्य अधिकारी उपस्थित होते.
रावसाहेब पाटील म्हणाले, ललित गांधी यांनी जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळातून राबवायच्या विविध योजनांचा आढावा घेतला. व्यापार, उद्योग, शेती कर्ज, महिला बचतगट अर्थसहाय्य, गृह कर्ज, विधवा पेन्शन या योजना एप्रिल २०२५ पासून सुरू करण्यासाठी अतिरिक्त निधीची मागणी मंत्री भरणे यांच्याकडे केली.
यावेळी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी जैन महामंडळाच्या योजनांसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देऊन अतिरिक्त निधी उपलब्ध करण्याची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे बैठक आयोजित करू, असे सांगितले. तसेच जैन मंदिर, स्थानक, संघ या नोंदणीकृत संस्थांद्वारे जैन पाठशाळा संचलित केल्या जातात, अशा पाठशाळांमध्ये जैन विद्यार्थी, जैन महिला शिक्षण घेतात, त्यांना केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
प्राकृत भाषेचे, संस्कृत भाषेचे तसेच संगणक शिक्षण देण्यासाठी अनुदान देण्यात येईल. पूर्णपणे पायी विहार (यात्रा) करणाऱ्या जैन साधू-साध्वींना त्यांच्या यात्रा मार्गात सोय नसलेल्या ठिकाणी विहार धाम निर्माण करण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल, असे त्यांनी आश्वासन दिले आहे.
अल्पसंख्याक मंत्रालयाचे प्रधान सचिव रूचेश जयवंशी यांनी महामंडळाच्या गतिशील कामकाजासाठी मंत्रालयाचे संपूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही यावेळी दिली. व्यवस्थापकीय संचालक जी. पी. मगदूम यांनी आभार मानले.