विजयसिंह गायकवाड यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:27 AM2021-03-10T04:27:20+5:302021-03-10T04:27:20+5:30
विटा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष विजयसिंह दिनकर गायकवाड (वय ५९) यांचे मंगळवारी दुपारी कऱ्हाडच्या ...
विटा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष विजयसिंह दिनकर गायकवाड (वय ५९) यांचे मंगळवारी दुपारी कऱ्हाडच्या कृष्णा रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.
खानापूर तालुक्यासह संपूर्ण राज्यभरात एक आदर्श मुख्याध्यापक म्हणून ते परिचित होते. राज्य शासनाने त्यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले होते. आपल्या संघटन कौशल्याने त्यांनी गेली दहा वर्षे राज्याच्या मुख्याध्यापक संघटनेचे नेतृत्व केले. त्यांच्या निधनाने शिक्षण, सामाजिक क्षेत्रांवर शोककळा पसरली आहे.
खानापूर तालुक्यातील जोंधळखिंडी येथील इंदिरा शिक्षण संस्थेच्या वाळूज येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे त्यांनी मुख्याध्यापक म्हणून सेवा बजावली. गेल्यावर्षी मे महिन्यात ते सेवानिवृत्त झाले होते. त्यानंतर संस्थेचे सचिव म्हणून ते कार्यरत होते. त्यांच्या कालावधीत वाळूज हायस्कूलचा शंभर टक्के निकालाचा पॅटर्न राज्यात परिचित झाला होता.
त्यांच्या कालावधीत शाळेला सातत्याने आदर्श शाळा म्हणून नावलौकिक मिळाला. सांगली जिल्हा मुख्याध्यापक संघाचे त्यांनी २० वर्षांहून अधिक काळ नेतृत्व केले, तर गेल्या दहा वर्षांपासून ते महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक मुख्याध्यापक महामंडळाचे नेतृत्व करीत होते. या कालावधीत मुख्याध्यापक आणि माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांच्या समस्या शासनदरबारी मांडण्याचे आणि त्या मार्गी लावण्याचे काम त्यांनी केले. इंदिरा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्रअण्णा देशमुख यांचे ते निकटवर्तीय होते. काही दिवसांपूर्वी प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर कराड येथे उपचार सुरू होते. मंगळवारी दुपारी उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, भाऊ, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने सांगली जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.