सांगलीत चार पिढ्यांच्या पशुवैद्यकीय सेवेने रचला विक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 03:40 PM2018-09-25T15:40:19+5:302018-09-25T15:48:25+5:30
पिढीजात व्यावसाय करणारी अनेक कुटुंबे जगभरात पहायला मिळतात, मात्र शंभर वर्षापासून व सलग चारही पिढ्या एकाचप्रकारची पदवी घेऊन पशुवैद्यकीय सेवेचा वारसा चालविण्याची किमया सांगलीच्या कुलकर्णी कुटुंबियांनी केली आहे. याची दखल घेत इंडिया बुक आॅफ रेकॉर्डने या कुटुंबियांचा सन्मान केला आहे.
सांगली : पिढीजात व्यावसाय करणारी अनेक कुटुंबे जगभरात पहायला मिळतात, मात्र शंभर वर्षापासून व सलग चारही पिढ्या एकाचप्रकारची पदवी घेऊन पशुवैद्यकीय सेवेचा वारसा चालविण्याची किमया सांगलीच्या कुलकर्णी कुटुंबियांनी केली आहे. याची दखल घेत इंडिया बुक आॅफ रेकॉर्डने या कुटुंबियांचा सन्मान केला आहे.
सांगलीच्या राम मंदिर परिसरात हे कुटुंब राहते. या कुटुंबातील पहिले पशुवैद्यकीय डॉक्टर नारायण तातो कुलकर्णी यांनी बॉम्बे पशुवैद्यक महाविद्यालयातून २६ जून २0१८ रोजी पशुवैद्यक सर्जन म्हणून पदवी घेतली. या गोष्टीला शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांनी त्यावेळी पहिल्या महायुद्धात सेवा बजावली आणि नंतर सांगलीच्या संस्थानिकांकडे पशुवैद्यकीय डॉक्टर म्हणून रुजू झाले.
सांगलीतला पहिला पशुवैद्यकीय दवाखानाही त्यांनीच संस्थानच्या माध्यमातून सुरू केला. कोल्हापूर पांजरपोळ येथेही त्यांनी नोकरी केली. १९५७ मध्ये ते निवृत्त झाले. त्यानंतर त्यांचे पुत्र डॉ. केशव नारायण कुलकर्णी यांनी १९५४ मध्ये मुंबईच्याच महाविद्यालयातून पशुवैदकीय पदवी प्राप्त केली. त्यानंतर ते शासकीय सेवेत रुजू झाले.
कोल्हापूर, अहमदाबाद व नंतर सांगली जिल्ह्यातील जुनोनी येथे त्यांनी काम केले. १९७२ मधील दुष्काळात त्यांनी दिलेल्या सेवेचा गौरव तत्कालिन केंद्र शासनाने राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार देऊन केला होता. त्यावेळी ५ हजार जनावरांसाठी त्यांनी राज्यातील पहिली चारा छावणी सुरू केली होती.
त्यानंतर याच घरातील तिसऱ्या पिढीत डॉ. मिलिंद केशव कुलकर्णी यांनी १९८१ मध्ये मुंबईच्याच महाविद्यालयातून पशुवैद्यकीय पदवी प्राप्त केली. त्यांनीही सरकारी नोकरी करीत कोल्हापूर, सांगली, सातारा तसेच गडचिरोली येथे आदिवासी भागात सेवा केली. सहाय्यक आयुक्त या पदावरून ते २0१६ मध्ये निवृत्त झाले.
आता त्यांची कन्या डॉ. तेजश्री मिलिंद कुलकर्णी हिने उदगीर येथून पशुवैद्यकीय पदवी प्राप्त केली आहे. पदव्युत्तर शिक्षणासाठी तिने तयारी सुरू केली आहे. पोल्ट्री सायन्स या विषयातील शिक्षण घेण्याची तयारी तिने सुरू केली आहे.
चारही पिढ्या एकाच व्यवसायात आणि तेही एकाचप्रकारच्या विभागातील पदवी घेऊन शासकीय सेवा तसेच समाजसेवेचा भाग म्हणून कार्यरत राहिली आहे. याबाबत इंडिया बुक आॅफ रेकॉर्डने त्यांना सन्मानित केले असून लवकरच त्यांचे स्नेही व नातेवाईक लिमका बुक आॅफ रेकॉर्डसाठीही प्रस्ताव दाखल करणार आहेत.