विक्रम सावंतांना काँग्रेस जिल्हाध्यक्षपद देणे गरजेचेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:32 AM2021-09-08T04:32:06+5:302021-09-08T04:32:06+5:30
जत : सलग तीनवेळा जत मतदारसंघात भाजपचा आमदार निवडून आला होता. विक्रम सावंत यांनी त्यांचा बालेकिल्ला मोडीत काढून काँग्रेसला ...
जत : सलग तीनवेळा जत मतदारसंघात भाजपचा आमदार निवडून आला होता. विक्रम सावंत यांनी त्यांचा बालेकिल्ला मोडीत काढून काँग्रेसला यश मिळवून दिले आहे. यामुळे त्यांना काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद देणे गरजेचेच होते, असे प्रतिपादन काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी केले. तसेच विक्रम सावंत आणि माझ्यात कोणतेही मतभेद नाही. मला राज्यस्तरावर जबाबदारी दिल्यामुळे मी समाधानी आहे, असेही ते म्हणाले.
विशाल पाटील जत येथे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी आमदार विक्रम सावंत, काँग्रेसचे कार्याध्यक्ष नाना शिंदे उपस्थित होते. विशाल पाटील म्हणाले, जिल्हाध्यक्ष पदाच्या शर्यतीत आमदार विक्रम सावंत यांचे नाव नव्हते. राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी यांचा आदेश आला. महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम व आमच्यात बैठक झाली. या बैठकीमध्ये आ. सावंत यांनी जत मतदारसंघामध्ये भाजपचा बालेकिल्ला मोडीत काढत त्या मतदार संघात काँग्रेसचा झेंडा फडकवला. म्हणून आमच्या सर्वांच्या सहमतीने जिल्हाध्यक्ष पद देण्यात आले. त्यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमध्ये काँग्रेस घवघवीत यश मिळवेल. दहा पंचायत समितीवर काँग्रेसचा झेंडा फडकविण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. जत, मिरज, पलूस कडेगाव या मतदारसंघांच्या ताकदीवर तसेच व अन्य तालुक्यांच्या मदतीने काँग्रेस पक्ष जिल्हा परिषदेवर झेंडा फडकवेल. विक्रम सावंत काँग्रेसला जिल्ह्यात पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करून देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
070921\img20210906112031.jpg
आ. सावंत यांनी जत मतदारसंघमध्ये भाजपचा बालेकिल्ला मोडीत काढत काँग्रेसचा झेंडा फडकविल्याने जिल्हाध्यक्ष पद देणे गरजेचेच होते
- विशाल पाटील