कलाशिक्षकाची कलाकृती, खडूने साकारले 'शिवराज्याभिषेक सोहळ्या'चे लक्षवेधी 'फलकचित्र'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2022 02:16 PM2022-02-19T14:16:50+5:302022-02-19T14:31:21+5:30
विविध रंगी खुडेने साकारलेल्या या फलकचित्रावरुन नजरच हटत नाही
गंगाराम पाटील
वारणावती: आपल्या जवळ असणाऱ्या कलेची प्रामाणिकपणे जपणूक आणि साधना करून कलाक्षेत्रात नाव मिळवणारे कलाशिक्षक विलास चौगुले यांचे फलकचित्रे सर्वत्र चर्चेत आहेत. सध्या शिवजंयती निमित्ताने साकारलेले शिवराज्याभिषेकाचे फलकचित्र कलेचा अप्रतिम नमूना ठरत आहे.
विलास चौगुले यांनी शिवजयंती दिनी फलकावर साध्या खडूने केलेल्या शिवरायावरील मातृसंस्कार, (बालाशिवाजी), व राज्याभिषेक सोहळा हे फलकचित्र सर्वांचे आकर्षण ठरत आहे. हे चित्र बघणाऱ्यांना विश्वासही बसणार नाही असे हे फलकचित्र आहे. जणू काही एखादे डिजिटल किंवा पेंटच आहे की काय असेच हे फलकचित्र वाटते. विविध रंगी खुडेने साकारलेल्या या फलकचित्रावरुन नजरच हटत नाही.
आरळा ता. शिराळा येथील गांधी सेवाधाम विद्यालयात कलाशिक्षक म्हणून कार्यरत असणारे विलास चौगुले शैक्षणिक तसेच सामाजिक कार्यक्रमांचे नित्यनेमाने फलक लेखन करत असतात. या फलक लेखनाच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक संदेश, सुभाषिते, प्रेरणादायी यश मिळवणाऱ्याना शुभेच्छा, जनजागृतीपर संदेश अत्यंत सुबक सुंदर अक्षरात लिहून जनजागृती करीत आहेत.
तिन्ही दलाचे प्रमुख बिपिन रावत यांना श्रद्धांजलीच्या फलक लेखनाचा व बिपिन रावत यांची हुबेहूब प्रतिमा रेखाटली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने रेखाटलेले फलक लेखन व डॉ. आंबेडकर यांची हुबेहूब काढलेली प्रतिमा खूप दाद देऊन गेली .
या कामी त्यांना शिक्षण संस्थचे चेअरमन आर. व्ही. हसबनीस, अध्यक्ष वैजनाथ महाजन, सचिव बं. चिं. दिगवडेकर, सर्व संचालक व मुख्याध्यापक आर. एस. हसबनीस, सर्व शिक्षक कर्मचारी यांचे प्रोत्साहन व सहकार्यं लाभत आहे.
आपल्या कले विषयी बोलताना विलास चौगुले म्हणाले ,माझे वडील मैदानी खेळ खेळायचे, नाटकामध्ये काम करायचे, मातीच्या छोट्या मोठ्या मूर्ती बनवायचे, अशिक्षित असूनही त्यांच्यात मला कलाकार दिसायचा त्यांचा माझ्या जीवनावर प्रभाव पडला पाचवीत असताना वडील वारले मात्र त्यांच्यातील कलाकार माझ्या रूपाने जिवंत ठेवायचा निर्धार केला. पुढे शालेय शिक्षण पूर्ण करत कलाविश्व विद्यालयात ए.एम. पदवी मिळवून गेल्या तीस वर्षापासून कला क्षेत्रात कार्यरत आहे.