जिल्ह्यातील ३३ गावांत गाव दत्तक योजना

By admin | Published: November 3, 2014 10:42 PM2014-11-03T22:42:53+5:302014-11-03T23:32:22+5:30

महसूल विभागाचा उपक्रम : मिरज, कवठेमहांकाळ, तासगाव या तालुक्यांचा समावेश

Village Adoption Scheme in 33 villages | जिल्ह्यातील ३३ गावांत गाव दत्तक योजना

जिल्ह्यातील ३३ गावांत गाव दत्तक योजना

Next

मिरज : मिरज उपविभागातील मिरज, तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्यातील ३३ गावात गाव दत्तक योजना सुरु करण्यात आली आहे. दत्तक गावातील ग्रामस्थांना शासकीय दाखले, शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासह महसूल खटले निकाली काढण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्या पुढाकाराने सुरु करण्यात आलेल्या गाव दत्तक योजनेबाबत तिन्ही तालुक्यातील तहसीलदार, नायब तहसीलदार व मंडल अधिकाऱ्यांची प्रांताधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. प्रांताधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडल अधिकारी प्रत्येक तालुक्यात एक गाव दत्तक घेऊन या गावातील महसुली कामांची निर्गती करणार आहेत. मिरज तालुक्यातील १३, तासगाव तालुक्यातील १२, कवठेमहांकाळ तालुक्यातील ९ गावांचा दत्तक योजनेत समावेश आहे. दत्तक योजनेत गावातील लोकप्रतिनिधींचाही समावेश करण्यात येणार असून योजनेंतर्गत कामकाजाचा प्रत्येक आठवड्याला आढावा घेण्यात येणार आहे. दत्तक गावात आठवड्यातील तीन दिवस मंडल अधिकारी भेट देऊन कामांची पूर्तता करणार आहेत. दत्तक योजनेंतर्गत लोकाभिमुख प्रशासन राबवून सर्व प्रकारच्या नोंदी, तक्रार नोंदी, शिधापत्रिका वाटप, श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, राष्ट्रीयत्व, रहिवास, जातीचे, उत्पन्नाचे व सर्व शासकीय दाखले, तहसीलदार व प्रांताधिकाऱ्यांकडून देण्यात येणारे सर्व परवाने व आदेशासाठी प्रलंबित प्रकरणांचा जलदगतीने निपटारा, कूळ कायदा शर्त कमी करणे, पाणंद रस्ते, शेती रस्त्यांच्या वादाचे निकाल गावात देण्यात येतील. गावातील महसूल वसुली, गौण खनिज वसुलीला प्राधान्य देऊन ग्रामस्थांना सर्व शासकीय योजनांचा लाभ गावात जाऊन देण्यात येणार आहे. सहा महिन्यांच्या कालावधित दत्तक गावांतील शंभर टक्के लाभार्थींना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. दत्तक गाव योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहून पुढील टप्प्यात उर्वरित गावात ही योजना राबविण्यात येणार असल्याचे हेमंत निकम यांनी सांगितले. दत्तक योजनेतील गावांकडे महसूल अधिकाऱ्यांचे विशेष लक्ष असले तरी, त्याचा उर्वरित गावांतील कामकाजावर कोणताही परिणाम होणार नसल्याचेही निकम यांनी स्पष्ट केले. यावेळी तहसीलदार किशोर घाडगे, राजेंद्र शेळके, रवींद्र डोंगरे उपस्थित होते. (वार्ताहर)

तीन तालुक्यातील दत्तक गावे
मिरज तालुका - कळंबी, विजयनगर, मानमोडी, अंकली, वाजेगाव, कदमवाडी, माळवाडी, कर्नाळ, रसूलवाडी, जानराववाडी, डोंगरवाडी, कानडवाडी व वड्डी.
तासगाव तालुका - भैरववाडी, योगेवाडी, जुळेवाडी, लोकरेवाडी, पानमळेवाडी, शिरगाव, बस्तवडे, मोराळे, नेहरूनगर, गोटेवाडी, कौलगे
कवठेमहांकाळ तालुका - मळणगाव, मोरगाव, कदमवाडी, जांभुळवाडी, करलहट्टी, लांडगेवाडी, रामपूरवाडी, पिंपळवाडी, गरजेवाडी.

Web Title: Village Adoption Scheme in 33 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.