Maratha Reservation: हिंगणगादे येथे सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना गावबंदी, सांगली जिल्ह्यातील पहिले गाव
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2023 01:58 PM2023-10-23T13:58:42+5:302023-10-23T14:00:07+5:30
नेत्यांना मराठा समाज त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही
दिलीप मोहिते
विटा : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सकल मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला असून मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांच्या आदेशानुसार राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर हिंगणगादे (ता. खानापूर) येथील ग्रामस्थांनी रविवारी सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेणारे हिंगणगादे हे सांगली जिल्ह्यातील पहिले गाव ठरले आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांनी सरकार विरोधात तीव्र आंदोलन हाती घेतले आहे. कोणत्याही परिस्थितीत आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नसल्याचा निर्णय जरांगे-पाटील यांनी जाहीर केला आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. त्यांनी त्यांच्या गावात राजकीय नेत्यांना गावबंदी केली आहे. असाच निर्णय महाराष्ट्रातील सर्व गावांनी घ्यावा, अशी विनंती जरांगे-पाटील यांनी मराठा समाजाला केली आहे.
या पार्श्वभूमीवर खानापूर तालुक्यातील हिंगणगादे गावातील ग्रामस्थ शंकर (नाना) मोहिते यांच्या नेतृत्वाखाली रविवारी एकत्रित आले. त्यावेळी ग्रामस्थांनी मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत कोणत्याच राजकीय नेत्याला तसेच पुढाऱ्याला गावात येऊ द्यायचे नाही, असा निर्णय घेतला. त्याचबरोबर कोणी एखादा राजकीय नेता किंवा पुढारी गावात जर आलाच तर त्याचा मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध आहे, असे समजून त्याच्यावर राजकीय बहिष्कार टाकण्याचाही निर्णय ग्रामस्थांनी घेतला.
यावेळी शंकर मोहिते म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आम्ही मनोज जरांगे-पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. राज्यातील नेते सदाभाऊ खोत, नारायण राणे, रामदास कदम या वाचाळविरांनी मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी धडपड सुरू केल्याचे दिसत आहे. परंतु आगामी काळात मराठा समाजाला विरोध करणाऱ्या सर्वच राजकीय नेत्यांना मराठा समाज त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही.
दरम्यान, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राजकीय नेत्यांना तसेच पुढाऱ्यांना गावबंदी करणारे हिंगणगादे हे सांगली जिल्ह्यातील पहिले गाव ठरले आहे. यावेळी तरुणांनी 'एकच मिशन.. मराठा आरक्षण' तसेच 'एक मराठा.. लाख मराठा' अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. यावेळी सरपंच अजितकुमार मोहिते, शंकर मोहिते, जालिंदर मोहिते, परशुराम साळुंखे, विष्णू यादव, महादेव कदम, निलेश निकम यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.