सांगली जिल्ह्यात १0१ गावात ‘एक गाव, एक गणपती’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 09:46 PM2017-08-25T21:46:59+5:302017-08-25T21:47:22+5:30
‘एक गाव एक गणपती’ या उपक्रमास यंदाही अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानाचे बक्षिस घेतल्यानंतर अनेक गावे या उपक्रमातून बाहेर पडली आहेत.
सांगली, दि. 25 - जिल्ह्यात ‘एक गाव एक गणपती’ या उपक्रमास यंदाही अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानाचे बक्षिस घेतल्यानंतर अनेक गावे या उपक्रमातून बाहेर पडली आहेत. यंदा केवळ जिल्ह्यातील १०१ गावातील ग्रामस्थांनी एकत्रित येऊन ‘एक गाव, एक गणपती’ बसविला आहे.
जिल्हा प्रशासव पोलिस यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एक गाव, एक गणपती’ हा उपक्रम राबविला जात आहे. गणेशोत्सवातील खर्च कमी व्हावा, वर्गणीची कोणावर सक्ती होऊ नये, लोकवर्गणीतून जमा झालेल्या रक्कम गावाच्या विधायक कामासाठी खर्च व्हावी, गाव म्हटले की गट-तट आले. मग गणेश आगमन व विसर्जन मिरवणुकीत मारामारी होऊ नये, पोलिसांवरील बंदोबस्ताचा ताण कमी व्हावा, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी ‘एक गाव, एक गणपती’ हा उपक्रम राबविला जात आहे.
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, तंटामुक्त गाव अभियान सुरु झाल्यानंतर या उपक्रमाचा अनेक गावांनी स्विकार केला. मात्र बक्षिस घेतल्यानंतर बहुतांश गाव उपक्रमातून बाहेर पडल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते. दोन वर्षापूर्वी १४० गावात हा उपक्रम राबविला. गतवर्षी हा आकडा ९६ होता. यामध्ये यंदा वाढ झाली आहे.
तंटामुक्त अभियानाय जिल्ह्याने २००८०९ मध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला होता. त्यावेळी २४५ गावात ‘एक गणपती’ बसला होता. २०१० मध्ये तब्बल ३०२ गावांनी या उपक्रमात सहभाग घेतला होता. पण त्यानंतर ही संख्या घटतच आहे. पोलिस प्रबोधन करुनही आजची पिढी एकमेकांवर इर्शा करण्यासाठी स्वतंत्रपणे मंडळाची स्थापना करुन गणेशाची प्रतिष्ठापना करीत आहेत.
पोलिस ठाणे निहाय आकडेवारी
सांगली ग्रामीण : ३
मिरज ग्रामीण : ५
क.महांकाळ : १४
जत : ४
उमदी : ६
आटपाडी : १८
विटा : १४
कडेगाव : ४
चिंचणीवांगी : २
कुंडल : ५
भिलवडी : १
तासगाव : २
कुरळप : १
शिराळा : ६
आष्टा : ३
कोकरुड : १०
इस्लामपूर : २
एकूण : १०१