बलवडीत २५ ला ग्रामीण मराठी साहित्य संमेलन
By admin | Published: December 16, 2014 10:33 PM2014-12-16T22:33:05+5:302014-12-16T23:38:01+5:30
सतीश लोखंडे : अध्यक्षपदी आ.ह.साळुंखे
विटा : खानापूर तालुक्यातील बलवडी (भा.) येथील ज्योतिर्लिंग साहित्य सेवा मंडळ व मारूती नाना पवार सार्वजनिक वाचनालयाच्या विद्यमाने बलवडी (भा.) येथे दि. २५ डिसेंबर रोजी २३ व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून, ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. आ. ह. साळुंखे यांची संमेलनाध्यक्षपदी निवड करण्यात आली असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष सुरेश चव्हाण व सतीश लोखंडे यांनी दिली.
हे संमेलन चार सत्रात होणार असून उद्घाटन इस्लामपूर येथील राजारामबापू पाटील ज्ञानप्रबोधिनीचे कार्यवाह प्रा. शामराव पाटील यांच्याहस्ते होणार आहे. त्यानंतर संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. आ. ह. साळुंखे यांचे मनोगत होणार असून, मान्यवरांच्याहस्ते संपतराव पवार, व्ही. वाय. पाटील व नथुराम पवार यांचा सत्कार होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या सत्रात ‘शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि ग्रामीण साहित्य’ या विषयावर परिसंवाद होणार असून, यात प्रा. बाबूराव गुरव, प्रसिध्द कादंबरीकार आनंद विंगकर व नागपूरचे जयदीप हार्डीकर सहभागी होणार आहेत.
तिसऱ्या सत्रात इस्लामपूरच्या कवयित्री सौ. नंदिनी साळुंखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होत असून, चौथ्या सत्रात ‘मी कात टाकली’ या प्रसिध्द कादंबरीचे लेखक व वाटंबरे येथील कथाकार जोतिराम फडतरे यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथन होणार आहे. या कथाकथन कार्यक्रमात प्रा. शांतिनाथ मांगले, एम. बी. जमादार यांच्यासह कथालेखक सहभागी होणार असल्याचेही सुरेश चव्हाण व सतीश लोखंडे यांनी सांगितले. (वार्ताहर)