गावठी पिस्तूल, काडतुसे जप्त
By admin | Published: March 8, 2016 12:08 AM2016-03-08T00:08:47+5:302016-03-08T00:53:18+5:30
विटा पोलिसांची कारवाई : तासगावच्या माजी सैनिकासह तिघांना अटक
विटा : विनापरवाना अवैध गावठी पिस्तूल व सहा जिवंत काडतुसे बाळगून त्यांची विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या विलास आनंदा मदने (वय ३४, रा. बोरगाव, ता. तासगाव) याच्यासह त्याचा मित्र विजय वसंत पवार (२९, रा. सुभाषनगर, लांडगोळ मळा, तासगाव) व भारतीय सैन्य दलातील माजी सैनिक मोहन वसंतराव पाटील (५६, रा. वरचे गल्ली, तासगाव) या तिघांना विटा पोलिसांनी अटक केली.
मुख्य संशयित विलास मदने याच्याकडून पोलिसांनी ३० हजार रूपये किमतीचे गावठी पिस्तूल, ३०० रूपये किमतीची सहा जिवंत काडतुसे व ५० हजार रूपये किमतीची दुचाकी असा एकूण ८० हजार ३०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास विटा-तासगाव रस्त्यावरील एसार पेट्रोल पंपाजवळ विटा पोलिसांनी ही कारवाई केली.
बोरगाव येथील विलास मदने हा विट्यात गावठी पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती विटा पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे व पोलीस निरीक्षक मोहन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेंद्र भिंगारदेवे, सुनील पाटील, सुहास खुबीकर, उत्तम माळी, विशाल चंद, विलास मुंढे आदींनी रविवारी रात्री एसार पेट्रोल पंपाजवळ सापळा लावला.
त्यावेळी मोटारसायकलवरून (क्र. एमएच १०-बीई-२५४) संशयित विलास मदने हा पेट्रोल पंपाजवळ आला. त्यावेळी पोलीस पथकातील कर्मचाऱ्यांनी त्याला थांबवून त्याची झडती घेतली असता, त्याच्या कमरेला छोट्या कापडी पिशवीत काळ्या व सोनेरी रंगाचे मॅग्झीन असलेले गावठी पिस्तूल आणि सहा जिवंत काडतुसे सापडली. पोलिसांनी तातडीने त्याला ताब्यात घेऊन पिस्तूल व काडतुसे जप्त केली.
या प्रकरणातील संशयित विलास मदने, विजय पवार व माजी सैनिक मोहन पाटील या तिघांना अटक करून सोमवारी दुपारी विटा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने संशयितांना दि. ८ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. सहायक पोलीस निरीक्षक ए. व्ही. चव्हाण पुढील तपास करीत आहेत. (वार्ताहर)
मित्राची ठेव...
विटा येथे केलेल्या कारवाईनंतर संशयित मदने यास विटा पोलीस ठाण्यात आणून त्याच्याकडे चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान त्याने, हे पिस्तूल आपला मित्र विजय वसंत पवार याने आपल्याकडे ठेवण्यासाठी दिल्याचे सांगितले. तसेच विजय पवार याने हे पिस्तूल त्याच्या ओळखीचा भारतीय सैन्य दलातील माजी सैनिक मोहन वसंतराव पाटील याच्याकडून विकत घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली.