देवराष्ट्रेत साकारतंय ग्रामीण पर्यटन केंद्र
By admin | Published: July 17, 2014 11:35 PM2014-07-17T23:35:38+5:302014-07-17T23:41:12+5:30
कोट्यवधीचा निधी : यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मघराचे पर्यटकांना आकर्षण
प्रताप महाडिक - कडेगाव
अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या देवराष्ट्रे गावाकडे यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या अनुषंगाने राज्य शासनाची नजर गेली. केवळ नजरच नाही, तर मेहेरनजर गेली. मेहरबान शासनाने गावावर निधीची न भुतो... अशी खैरात केली. यातून देवराष्ट्रे गावात साकारतेय एक ग्रामीण पर्यटन केंद्र. हे गाव आदर्श गाव साकारण्याचा शासनाचा मनोदय आहे.
यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त देवराष्ट्रे या त्यांच्या जन्मगावी करण्यात येणाऱ्या विकास कामांसाठी १२ कोटी २२ लाख रुपयांचा निधी शासनाने दिला. मोठ्या प्रमाणात निधीची उपलब्धता आणि आदर्श गाव संकल्पना यामुळे स्थानिक नेत्यांनीही राजकारण बाजूला ठेवून सुरुवातीपासून विकासकामांना साथ दिली. परंतु, तसजशी कामे होत गेली, तशा काही कामांबाबत तक्रारी झाल्या. निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाईचा इशारा दिल्यावर, काही ठेकेदारांनी निकृष्ट झालेली कामे दुरूस्त करून घेतली. अशा काही उणिवा वगळता देवराष्ट्रे आदर्श गाव संकल्पनेतून एक ग्रामीण पर्यटन केंद्र होण्याच्यादृष्टीने वाटचाल करीत आहे.
देवराष्ट्रे येथील विकास कामांसाठी यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी निधीतून ८ कोटी ३१ लाख रूपयांचा निधी मिळाला. जिल्हा नियोजनमधून २ कोटी, तर राष्ट्रीय पेयजल योजनेतून १ कोटी ६१ लाख असा १२ कोटी २२ लाख रुपयांचा निधी देवराष्ट्रे गावासाठी मिळाला. यातून पिण्याच्या पाण्याची राष्ट्रीय पेयजल योजना, गावातील अंतर्गत रस्ते, ग्रंथालय, शाळा इमारत दुरूस्ती व कंपाऊंड, गावाला जोडणारे मुख्य रस्ते अशी विविध विकासकामे झाली आहेत. शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि जन्मघर स्मारकाचा निधी जागेअभावी अद्याप पडून आहे.
देवराष्ट्रेतील शाळा संगणकीकृत झाली आहे. अद्ययावत ग्रंथालय साकारले आहे. याशिवाय यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू होणार आहे. एकंदरीत यशवंतमय झालेले देवराष्ट्रे लवकरच ग्रामीण पर्यटन केंद्र म्हणून नावारूपास येईल, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे.