'त्या' मृत तरुणाच्या कुटुंबाचे ग्रामस्थांनी स्वीकारले पालकत्व, गौतमी पाटीलच्या शोदरम्यान चेंगराचेंगरी झाला होता मृत्यू
By संतोष भिसे | Published: November 5, 2022 01:11 PM2022-11-05T13:11:01+5:302022-11-05T13:12:13+5:30
बुरसे यांनी ओमासे कुटुंबाची आर्थिक कोंडी लक्षात घेऊन मदतीचा हात पुढे केला.
टाकळी : बेडग (ता. मिरज) येथे लावणी शोदरम्यान दत्तात्रय विलास ओमासे (वय ४४) या तरुणाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे त्यांचे कुटूंब उघड्यावर पडले आहे. त्यांची जबाबदारी पेलण्यासाठी बेडगचे संवेदनशील ग्रामस्थ पुढे सरसावले आहेत.
पंचायत समितीचे माजी सभापती दिलीप बुरसे व बंधू बापू बुरसे यांनी यांच्या तीन मुलींच्या नावे प्रत्येकी १० हजार रुपयांची ठेव ठेवली. मदतीचा धनादेश ओमासे कुटुंबाकडे सुपुर्द केला. बाळासाहेब ओमासे यांनीही प्रत्येक महिन्याचे किराणा सामान भरुन देण्याचा निर्णय जाहीर केला. या मदतीने ओमासे कुटुंबाला दिलासा मिळाला आहे.
बेडगमध्ये प्राथमिक शाळेच्या आवारात गेल्या रविवारी गौतमी पाटील हिच्या लावणी शोदरम्यान मोठी चेंगराचेंगरी झाली होती. कार्यक्रमानंतर शाळेच्या कुंपणभिंतीबाहेर ओमासेंचा मृतदेह आढळला. पोलीस केस, पंचनामा आदी सोपस्कार पूर्ण झाले. मृतदेहावर अंत्यसंस्कारही झाले. पण निराधार झालेल्या कुटुंबाचा कोणीही विचार केला नाही. काही ग्रामस्थांनी लावणी शो नंतर येऊन सांत्वन केले, पण कोरड्या सांत्वनाने पोटाचा प्रश्न सुटणार नाही याकडे दुर्लक्ष केले. बुरसे यांनी ओमासे कुटुंबाची आर्थिक कोंडी लक्षात घेऊन मदतीचा हात पुढे केला. तीनही मुलींच्या नावे ठेवपावत्या केल्या. अन्य ग्रामस्थही मदतीसाठी पुढे येऊ लागले आहेत.
कर्ता पुरुष गेला, पोट कसे भरायचे?
ओमासे यांच्या पश्चात पत्नी, वृद्ध आई आणि पाच, सात व आठ वर्षे वयाच्या तीन मुली आहेत. मुळचे यड्राव, इचलकरंजी येथील ओमासे कुटूंब काही वर्षांपूर्वी उदरनिर्वाहासाठी बेडग येथे रहायला आले होते. दत्तात्रय शेतमजुरी करुन कुटुंबाचे पालनपोषण करायचे. गावात स्वत:चे घरही नाही. दत्तात्रय यांच्या मृत्यूमुळे कुटुंबापुढे पोट भरण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे