वलवणच्या शाळेच्या कायापालटाचा ग्रामस्थांचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:32 AM2021-09-09T04:32:06+5:302021-09-09T04:32:06+5:30
खरसुंडी : मॉडेल स्कूल योजनेत आटपाडी तालुक्यातील वलवण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा समावेश आहे. ग्रामस्थांनी शासन निधी, लोकसहभागातून ...
खरसुंडी : मॉडेल स्कूल योजनेत आटपाडी तालुक्यातील वलवण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा समावेश आहे. ग्रामस्थांनी शासन निधी, लोकसहभागातून शाळेचा कायापालट करण्याचा निर्धार व्यक्त केला.
मॉडेल स्कूल योजनेंतर्गत ८० टक्के निधी जिल्हा परिषदेच्या विविध विभागांकडून व लोकसहभागातून २० टक्के निधी उपलब्ध करून शाळेचा चेहरामोहरा बदलण्यासाठी गावकरी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी सहा लाखाच्या कामाचे लोकवर्गणीतून नियोजन करण्यात आले. आनंदराव नामदेव जाधव यांच्याकडून प्रवेशद्वार कमान आणि भाऊसाहेब जाधव यांच्याकडून शाळेच्या आवारात पेव्हिंग ब्लॉक बसवण्यात येणार आहेत. त्यांचा सत्कार गटविकास अधिकारी मनोज भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी सरपंच दगडू गेजगे, उपसरपंच मारुती जाधव, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आबासाहेब जाधव, विलासराव गुरव, संतोष जाधव, मानसिंग भिसे, मुख्याध्यापक धनंजय देठे उपस्थित होते.