बिबट्याच्या मुक्त संचाराने ग्रामस्थांत भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:25 AM2021-03-19T04:25:17+5:302021-03-19T04:25:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : शिराळा तालुक्यात बिबट्या आता सर्वत्र दिसू लागला आहे. हा बिबट्या नरभक्षक बनल्याने त्याचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : शिराळा तालुक्यात बिबट्या आता सर्वत्र दिसू लागला आहे. हा बिबट्या नरभक्षक बनल्याने त्याचा तातडीने बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने पावले उचलण्याची गरज आहे. बिबट्याच्या मुक्त संचारामुळे पाळीव प्राण्यांबरोबरच मानवावर हल्ला करण्यापर्यंत मजल गेली असल्याने तालुक्यातील वाडी-वस्तीवर भीतीचे वातावरण आहे.
चांदोली राष्ट्रीय उद्यानात बिबट्याचा वावर हा कायमचाच आहे. त्यातील काही बिबटे अन्नाच्या शोधत बाहेर पडले. त्यांचा वावर हा चांदोली राष्ट्रीय उद्यानापासून ६० किमी अंतरापर्यंत आहे. हा डोंगरी तालुका असल्याने बिबट्याला राहण्यासाठी सुरक्षित जागा आहे. आता उसाचे क्षेत्र वाढल्याने त्याच्यासाठी गावोगावी मिनी जंगल तयार झाले आहे. त्याला ससे, डुक्कर, कुत्री, वानरे हे चांगले खाद्य मिळू लागले आहे. राहायला सुरक्षित जागा व खायला पुरेसे अन्न व प्यायला नदी व पाझर तलावातील मुबलक पाणी मिळत असल्याने त्याला पुन्हा उद्यानात जाण्याची आवश्यकता वाटत नाही. त्यामुळे बिबट्याने गावोगावी आपले वास्तव्य निर्माण केले आहे.
वन्य व पाळीव प्राण्यांवर हल्ला करणारा बिबट्या आता माणसावर हल्ले करू लागला आहे. त्यामुळे लोकांच्यात भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
बिबट्याने आतापर्यंत तालुक्यातील मांगरूळ ,बिळाशी, वाकुर्डे, येळापुर, कुसाईवाडी, मांगले, मिरुखेवाडी, बेरडेवाडी, निगडी, शिराळा, मोरणा धरण, कांदे, कापरी, रेड, आदी परिसरातील पाळीव प्राण्यांवर हल्ले करून त्यांना ठार मारले आहे.
दोन वर्षांपूर्वी गोरक्षनाथ मंदिरजवळील बाह्य वळण रस्त्यावर बिबट्याने मोटारसायकलवर उडी मारून शिराळा येथील युवक अभिजित कुरणे यांच्या पायावर पंजा मारून जखमी केले होते. आठ महिन्यांपूर्वी चरण येथील युवक व त्यानंतर मांगले येथील युवकावर हल्ला केला होता. तडवळे येथे एक वर्षाच्या सुफीयानचा बळी घेतला.
जून महिन्यात घागरेवाडी येथे जनावरांच्या गोठ्यात घुसलेल्या व चार महिन्यांपूर्वी मांगले येथे बिबट्यास पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले आहे. पश्चिम घाटात बिबट्यांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे अनेक बिबटे जंगल सोडून बाहेर पडत आहेत. त्यामुळे तो ज्या भागात फिरतो, त्याच भागात कायम वास्तव्य करतो. त्या परिसरात अन्नासाठी भटकत असतो.
चौकट-
चांदोली अभयारण्यमधून बाहेर पडलेल्या बिबट्यांच्या पुढील पिढीचा जन्म ऊस, गावांजवळ असणाऱ्या वनराईमध्ये झाला आहे. त्यामुळे या नवीन पिढीला जंगलाशी संपर्क नाही. त्यामुळे तेथील भक्ष्य काय, आदींची माहिती नाही. त्यामुळे हे बिबटे या परिसरातच वाढत आहे. हे बिबटे ऊसपिकांच्या शेतातच फिरत आहेत. तिथे त्यांच्या अन्न साखळीत अडथळे निर्माण झाल्याने त्यांचे हल्ले मानवी वस्तीवरील जनावरे आणि माणसांवर सुरू झाले आहेत. काही महिन्यांत ही संख्या लक्षणीय असेल. त्यामुळे आतापासूनच यावर काही निर्बंध घालणे आवश्यक आहे.