भडकंबे ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराविरोधात ग्रामस्थांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:24 AM2021-01-22T04:24:19+5:302021-01-22T04:24:19+5:30
भडकंबे (ता. वाळवा) ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराविरोधात ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेसमोर उपोषण आंदोलन सुरू केले. लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : भडकंबे (ता. ...
भडकंबे (ता. वाळवा) ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराविरोधात ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेसमोर उपोषण आंदोलन सुरू केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : भडकंबे (ता. वाळवा) ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराबद्दल सरपंच व ग्रामसेवकांवर कारवाईसाठी ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण सुरू केले. सरपंचांची हकालपट्टी करावी व ग्रामसेवकाला बडतर्फ करावे, अशी आंदोलकांची मागणी आहे.
मुख्य तक्रारदार नितीन बागणे यांच्यासह सुमारे पंचवीसभर ग्रामस्थ उपोषणाला बसले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भ्रष्टाचाराच्या तक्रारीनंतर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश वाळव्याच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिले होेते. बीडीओ शशिकांत शिंदे यांनी केलेल्या चौकशीत लाखो रुपयांची अनियमितता व भ्रष्टाचार दिसून आला. यासाठी जबाबदार सरपंच व ग्रामसेवकांवर कारवाईची मागणी आंदोलकांनी केली आहे. गैरव्यवहाराची रक्कम त्यांच्याकडून वसूल करावी, अशीही मागणी आहे.
आंदोलनात परशुराम बामणे, संभाजी तळप, अमोल बागणे, आनंदा पाटील, गजानन बागणे, संभाजी पाटील, आनंदा पाटील, रवींद्र पाटील, दीपक पाटील, ज्ञानदेव बावचकर, वसंत पाटील, मारुती बागणे, महादेव पाटील आदी सहभागी झाले आहेत.
चौकट
२०१६ पासून आर्थिक गैरव्यवहार
चौदाव्या वित्त आयोगातून पाणीपुरवठा विभागात खर्च केलेल्या ६८ हजारांच्या खर्चाचे मूल्यांकन आढळले नाही. ग्रामनिधीतून ४ लाख ६७ हजार ३८६ रुपये प्रमाणाविना खर्च केले आहेत. पाणीपुरवठा विभागात ४० हजार ४४ रुपये तर चौदाव्या वित्त आयोगातून २९ लाख ७९ हजार ६५७ रुपयांच्या खर्चात अनियमितता आढळली आहे. २०१६-१७ ते २०१९-२० अखेर हा गैरव्यवहार असल्याची आंदोलकांची तक्रार आहे.
-----------