सांगलीचे विनायक साळुंखे करणार आंतरराष्ट्रीय युवा परिषदेत भारताचे नेतृत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 04:36 PM2018-07-20T16:36:51+5:302018-07-20T16:38:53+5:30

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील मिरजवाडी येथील विनायक साळुंखे हे अमेरिकेतील न्यूयॉर्क विद्यापीठात आयोजित आंतरराष्ट्रीय युवा नेतृत्व परिषदेत भारताचे नेतृत्व करणार आहेत. या निमित्ताने विश्व स्तरावर ग्रामीण महाराष्ट्राची मोहर उमटणार आहे.

Vinayak Salunke of Sangli will lead India's leadership in International Yuva Parishad | सांगलीचे विनायक साळुंखे करणार आंतरराष्ट्रीय युवा परिषदेत भारताचे नेतृत्व

सांगलीचे विनायक साळुंखे करणार आंतरराष्ट्रीय युवा परिषदेत भारताचे नेतृत्व

ठळक मुद्देसांगलीचे विनायक साळुंखे करणार आंतरराष्ट्रीय युवा परिषदेत भारताचे नेतृत्वग्रामीण भागाच्या विकासासाठी काम करणार : विनायक साळुंखे

नवी दिल्ली/सांगली  : सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील मिरजवाडी येथील विनायक साळुंखे हे अमेरिकेतील न्यूयॉर्क विद्यापीठात आयोजित आंतरराष्ट्रीय युवा नेतृत्व परिषदेत भारताचे नेतृत्व करणार आहेत. या निमित्ताने विश्व स्तरावर ग्रामीण महाराष्ट्राची मोहर उमटणार आहे.

अमेरिकेतील मिरॅकल कॉर्नर्स ऑफ द वर्ल्ड या आंतरराष्ट्रीय संस्थेद्वारे २४ जुलै ते २ ऑगस्ट २०१८ या कालावधी दरम्यान 'यंग लिडर्स ऍक्सेस प्रोग्राम' साठी जगातून ५० युवकांची निवड झाली असून भारतातून विनायक साळुंखे यांची निवड करण्यात आली आहे.

तीन फेऱ्यानंतर झाली अंतिम निवड 

आंतरराष्ट्रीय परिषदेतील निवडीसाठी तीन फेऱ्या घेण्यात आल्या होत्या. यावर्षी जानेवारी महिन्यात निबंध स्पर्धेची पहिली फेरी पार पडली. ऐच्छिक विषयांवरील या निबंध स्पर्धेत विनायक यांनी ग्रामीण भागातील बेरोजगारी व त्यावरील उपाय या विषयीचे विवेचन केले होते. यानंतर मार्च महिन्यात व्हिडीओ मुलाखत आणि एप्रिल महिन्यात फिल्ड असेसमेंट सर्वे अशा फेरी होऊन  सांळुखे यांची अंतिम निवड करण्यात आली.

ग्रामीण भागाच्या विकासासाठी काम करणार : विनायक साळुंखे

या निवडीनंतर महाराष्ट्र परिचय केंद्राशी बोलताना विनायक साळुंखे म्हणाले, माझ्या सारख्या ग्रामीण भागातील तरुणाची आंतरराष्ट्रीय युवा नेतृत्व परिषदेसाठी निवड झाली याचा खूप आनंद आहे. या परिषदेत सहभागी होऊन माझ्या भागातील विषय मला मांडता येतील व जगाच्या विविध भागातून आलेल्या प्रतिनिधींचे विचारही मला ऐकता व समजता येतील. या परिषदेतून ग्रामीण भागातील बेरोजगारी निर्मूलनासाठी तयार करण्यात येणा-या कार्यक्रमाची अंमलबाजवणी करून ग्रामीण भागाच्या विकासासाठी कार्य करणार असल्याचा मनोदयही साळुंखे यांनी व्यक्त केला.          

मिरजवाडी या छोटयाशा खेड्यातील विनायक साळुंखे यांनी पर्यावरणशास्त्र या विषयात उच्च शिक्षण घेतले आहे. वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षांपासून नेहरू युवा केंद्राशी ते जुडले असून ग्रामीण तरुणांसोबत त्यांच्या  समस्यांवर काम करीत आहेत. दोन वर्षांपूर्वी त्यांची 'मुख्यमंत्री  फेलोशिप' साठी निवड झाली होती.अनेक सामाजिक संस्थासोबत ते सामाजिक कार्यात आपले योगदान देत आहेत. 'युवक बिरादरी, भारत' या संस्थेच्या २०१७ च्या 'युवा भूषण' पुरस्काराचे ते विजेते आहेत.   

आंतरराष्ट्रीय युवा परिषद

मिरॅकल कॉर्नर्स ऑफ द वर्ल्ड  ही संस्था समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी कार्यरत असणाऱ्या जगभरातील युवकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर युवा नेतृत्व विकसित करण्यासाठी संधी उपलब्ध करून देते.

इथे अमेरिकेतील तसेच जगभरातील विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्ती या तरुणांना मार्गदर्शन करीत असतात, जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या तरुणांच्या विचार आणि कल्पनांच्या देवाण घेवाणीतून प्रत्येकाला आपल्या समाजात असणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी आराखडा तयारही करायचा असतो.

ग्रामीण तरुणांच्या समोरील बेरोजगारी या समस्येवर विनायक या परिषदेत चर्चा करणार आहेत. पहिल्यांदाच ग्रामीण भागातून आंतरराष्ट्रीय स्तरावर ग्रामीण तरुणांचे प्रतिनिधित्व करण्यास निघालेल्या विनायक साळुंखे यांचे सर्व क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

 

Web Title: Vinayak Salunke of Sangli will lead India's leadership in International Yuva Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली