द्राक्षबागा कोसळल्या
By admin | Published: April 2, 2017 11:28 PM2017-04-02T23:28:41+5:302017-04-02T23:28:41+5:30
सावळजमध्ये अवकाळीचा फटका : ४५ लाखांचे नुकसान
तासगाव : सावळज (ता. तासगाव) येथे वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने तीन शेतकऱ्यांच्या द्राक्षबागांचे मंडप तुटून बागा कोसळल्या. द्राक्षबागा जमीनदोस्त झाल्याने सुमारे ४५ लाखांचे नुकसान झाले आहे.
शनिवारी सावळजसह परिसरात गारपीट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. या पावसात सावळज येथील शेतकरी सिदगौंड रघुनाथ पाटील यांची दीड एकर द्राक्षबाग, विजय भाऊसाहेब पाटील यांची सव्वा एकर आणि अरुण पाटील यांची अडीच एकर बाग कोसळून जमीनदोस्त झाली. त्यामुळे सुमारे ४० ते ४५ लाखांचे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांच्या तयार द्राक्षबागाही अवकाळीच्या तडाख्यात सापडल्या आहेत. याशिवाय खरडछाटणी घेतलेल्या द्राक्षबागांचेही मोठे नुकसान झाले आहे.