द्राक्षबागेचा उत्पादन खर्च चौपट; दहा वर्षांत उत्पन्न मात्र जैसे थे; शासन पातळीवर उदासीनता
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2023 06:40 PM2023-03-11T18:40:44+5:302023-03-11T18:40:59+5:30
शासन पातळीवर उदासीनता
दत्ता पाटील
तासगाव : जिल्ह्याला जगभर ओळख आणि आर्थिक समृद्धी देणाऱ्या द्राक्षाच्या उत्पादन खर्च आणि उत्पन्नाचे गणित कोलमडले आहे. गेल्या दहा वर्षांत द्राक्षाचा उत्पादन खर्च चौपट झाला आहे. मात्र उत्पन्न दहा वर्षांपूर्वी होते तेवढेच राहिले आहे. द्राक्षबागेतून रोजगारनिर्मितीसह आर्थिक चलन मजबूत करणारा उत्पादक कंगाल होत आहे.
दहा वर्षांपूर्वी एक एकर द्राक्षबागेचा सरासरी उत्पादन खर्च ७० हजार रुपये होता, तर उत्पन्न चार ते पाच लाख रुपये होते. यंदाच्या हंगामात उत्पादन खर्च सरासरी अडीच लाखापर्यंत गेला असून, दराचे गणित कोलमडल्यामुळे उत्पन्न मात्र चार ते पाच लाखावरच थांबले आहे.
जिल्ह्यात द्राक्षबागेचे सुमारे ३३ हजार हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी सुमारे पाच हजार हेक्टरवरील द्राक्षांची भारताबाहेर निर्यात होते. २१ हजार हेक्टरवरील द्राक्षे देशाच्या कानाकोपऱ्यात विक्रीसाठी जातात, तर सात हजार हेक्टरवरील द्राक्षांचा बेदाणा होतो. द्राक्षबागांच्या माध्यमातून सुमारे ७०० ते ८०० कोटींची उलाढाल दरवर्षी होते.
अलीकडच्या काळात पाणी योजनांचे पाणी फिरलेल्या भागात शेतकऱ्यांनी द्राक्षबागांची लागवड केली. कोरोना महामारीपूर्वी सर्वाधिक नफा देणारे पीक म्हणून द्राक्षाची ओळख होती. साधारणत: एकरी दोन लाख रुपये खर्च केला तर त्यातून आठ ते दहा लाखांचे उत्पन्न मिळत होते. मात्र तीन वर्षांपासून बागांची परिस्थिती चिंताजनक ठरत आहे.
शासन पातळीवर उदासीनता
द्राक्ष निर्यातीला केंद्र शासनाकडून मिळणारे अनुदान बंद झाले आहे. याउलट बांगलादेशात द्राक्ष निर्यात करत असताना यावर्षी तेथे सीमाशुल्क लावल्यामुळे द्राक्ष निर्यात करणे खर्चिक होत आहे. या सगळ्याचा परिणाम खरेदीवर होत आहे. निर्यातीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी धोरणात्मक निर्णय हवा आहे.
..असा वाढला उत्पादन खर्च
मजुरीच्या दरात वाढ, औषधांचा वाढत जाणारा खर्च, अनियंत्रित महागड्या संजीवकांचा आणि केमिकलचा वापर, औषध कंपन्यांची मनमानी, खासगी सल्लागारांचा सुळसुळाट, बेभरवशाचे हवामान अशा अनेक कारणांमुळे द्राक्ष उत्पादनाचा खर्च वाढत चालला आहे. दुसरीकडे द्राक्षाचा दर मात्र घसरत चालला आहे.
कोरोनामुळे बाजारपेठ उपलब्ध झाली नसल्याचे कारण पुढे करून व्यापाऱ्यांनी कवडीमोल दराने द्राक्षांची खरेदी केली. यावर्षी हवामान चांगले होते. द्राक्षाची गुणवत्ता आणि दर्जादेखील चांगला आहे. मात्र व्यापाऱ्यांनी मक्तेदारी निर्माण केल्यामुळे अपेक्षित भाव मिळाला नाही.