Sangli: द्राक्ष बागांना पाणीटंचाईचा फटका; खरड छाटणी रखडली
By अविनाश कोळी | Published: April 3, 2024 07:06 PM2024-04-03T19:06:00+5:302024-04-03T19:06:28+5:30
आर्थिक ताळमेळ घालताना बळीराजाची कसरत
जालिंदर शिंदे
घाटनांद्रे : कवठेमहांकाळ तालुक्यात द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, बळीराजाला आता खरड छाटणीचे वेध लागले आहेत. परंतु, त्यालाही पाणीटंचाईचा मोठा फटका बसत आहे. छाटणीच्या वेळी द्राक्ष बागेला पाण्याची मोठी आवश्यकता असते. आताच पाण्याची ही अवस्था तर अद्यापही अजून अडीच महिने प्रखर उन्हाळा बाकी आहे. छाटणी घेण्यासाठीही बळीराजाला मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
तालुक्यात ३२८३.८६ हेक्टर द्राक्ष पिकाचे क्षेत्र आहे. तर, घाटमाथ्यावरील घाटनांद्रे, तिसंगी, वाघोली, गर्जेवाडी, कुंडलापूर, जाखापूर व कुची परिसरात ४४५.१० हेक्टर इतके द्राक्ष पिकाचे क्षेत्र आहे. चालू वर्षी व्यापारी व दलाल यांच्याकडून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची होणारी आर्थिक फसवणूक, मिळणारा कमी दर यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी बेदाणा निर्मितीलाही मोठी पसंती दिली आहे.
द्राक्ष हंगाम हा अंतिम टप्प्यात आला आहे. यंदा आर्थिक जमाखर्चाचा ताळमेळ कसाबसा घालून शेतकरी सावरतो ना सावरतो तोच त्याला आता खरड छाटणीच्या खर्चाला सामोरे जावे लागत आहे. छाटणीसाठी आता त्याला एकरी २५ हजार रुपये मोजावे लागत आहेत. छाटणीसाठी मजूर झाडागणीक चार रुपये मागत आहेत. त्यामुळे बळीराजाला द्राक्ष शेती करणेही मुश्कील झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
छाटणीसाठीचा येणारा खर्च
छाटणीस पाच हजार रुपये, पेस्ट लावणे तीन हजार रुपये, काडी निरळणे चार हजार रुपये, पहिले सबकेन अडीच हजार रुपये, शेंडा मारणे दोन हजार रुपये, पहिला खुडा तीन हजार, दुसरा खुडा तीन हजार रुपये, तिसरा खुडा अडीच हजार रुपये असा २४ हजार ५०० रुपये एक एकर बाग छाटणीसाठी खर्च येत आहे.