मिरजेत प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:28 AM2021-04-07T04:28:26+5:302021-04-07T04:28:26+5:30
प्रशासनाने लागू केलेल्या नवीन निर्बंधांचे उल्लंघन करून मिरजेत मंगळवारी रस्त्यावर बाजार सुरूच होते. बाजारात विक्रेते व ग्राहकांनी गर्दी केली ...
प्रशासनाने लागू केलेल्या नवीन निर्बंधांचे उल्लंघन करून मिरजेत मंगळवारी रस्त्यावर बाजार सुरूच होते. बाजारात विक्रेते व ग्राहकांनी गर्दी केली होती. अत्यावश्यक सेवेसह अन्य दुकानेही नेहमीप्रमाणेच सुरू होती. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने सायंकाळी शहरातील मार्केटसह प्रमुख बाजारपेठ बंद करण्यांत आली. काही विक्रेत्यांनी बंद करण्यास विरोध केल्याने वादावादीचे प्रकार घडले. लक्ष्मी मार्केट परिसरातील दुकाने सक्तीने बंद केल्यानंतर शहरात विविध भागात सुरू असलेली दुकाने बंद झाली. निर्बंध झुगारून दुकाने सुरू ठेवणाऱ्यांना महापालिका व पोलिसांनी कारवाईचा इशारा दिला. शहरातील किसान चौक, टाउन हॉल, लक्ष्मी मार्केट परिसर, हिंदमाता चौक, लोणी बाजार रस्ता, दत्त चौक, परिसरातील खाद्यपदार्थ व अन्य वस्तू विक्रीच्या हातगाड्या, भाजी व फळ विक्रेते, सरबत कोल्ड्रिंक्स विक्रेत्यांना पिटाळून लावण्यात आले. किराणा दुकाने बेकरी डेअरी व औषध दुकाने वगळता सर्व दुकाने बंद राहणार असल्याचे प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी सांगितले.
चाैकट
दारूसाठी तळीरामांची झुंबड
वाइन व लिकर शॉप बंद असल्याने परमिट रूममध्ये पार्सलची सेवा सुरू होती. यामुळे बारमध्ये दारू खरेदीसाठी मिरजेत तळीरामांची झुंबड उडाली होती. काही बारमध्ये जादा दराने दारूची विक्री सुरू होती. परमिट रूमही सायंकाळी बंद करण्यात आले.