अवघड भाषेतील समीक्षेने मराठीची हानी:वसंत केशव पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 11:04 PM2018-10-14T23:04:13+5:302018-10-14T23:04:23+5:30
सांगली : मराठीत लेखनासाठी अनेक दर्जेदार विषय असताना, मराठीतील लेखक आपल्याच कोशात रमले आहेत. त्यामुळे भाषेचा सर्वांगीण आवाका वाचकांपर्यंत ...
सांगली : मराठीत लेखनासाठी अनेक दर्जेदार विषय असताना, मराठीतील लेखक आपल्याच कोशात रमले आहेत. त्यामुळे भाषेचा सर्वांगीण आवाका वाचकांपर्यंत पोहोचविण्यात अपयश येत आहे. सहज सोप्या भाषेत समीक्षण न करता, रूढ भाषा अवघड करत मराठीचे सर्वाधिक नुकसान हे समीक्षकांनीच केले असल्याची टीका ज्येष्ठ समीक्षक वसंत केशव पाटील यांनी रविवारी सांगलीत केले.
शब्दसाहित्य विचार मंचच्यावतीने ‘लेखक समजून घेताना’ उपक्रमांतर्गत कवयित्री लता ऐवळे-कदम व युवा नाटककार इरफान मुजावर यांनी वसंत केशव पाटील यांची मुलाखत घेत, साहित्यविश्वातील अनेक घडामोडींवर प्रकाश टाकला. यावेळी पाटील यांनी परखडपणे मते व्यक्त करत साहित्यिकांच्या मानसिकतेवर प्रहार केला.
पाटील म्हणाले की, साहित्यात अनेक प्रवाह असताना, साहित्यिकांनी हे प्रवाहच समजून घेतले नाहीत. किती लिहिले पाहिजे यापेक्षा काय लिहिले पाहिजे, हेच लेखकांना समजले नसल्याने, अनेक चांगले विषयही वाचकांपासून दूरच राहिले. समीक्षणातून वाचकांना अधिक समजणे अपेक्षित असताना, आपल्या मराठी समीक्षकांनी समीक्षणाची भाषा अवघड करून ठेवली व त्याचा फटका मराठी साहित्याला बसला. त्यापेक्षा सहज सोप्या भाषेतून समीक्षण झाले असते, तर ते अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचले असते. प्रत्येक लेखकाची बांधिलकी ही शब्दांशी असली पाहिजे.
अनुवादनाच्या निमित्ताने देशभर फिरलो. यावेळी अनेकविध अनुभव आले. त्यांचा अनुवादनावेळी खूपच फायदा झाला. लेखन ही ताकद समजून मी त्याच्याशी प्रामाणिक राहून लेखन केले. त्यामुळे प्राध्यापक म्हणून कार्यरत असतानाही मोर्चा, आंदोलनात कधी सहभागी झालो नाही. लेखनापेक्षा अनुवादित साहित्य जास्त असण्याचे कारण म्हणजे, वाचन जास्त झाल्याने अनुदानाकडे वळल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी शब्दसाहित्य विचार मंचचे अभिजित पाटील, सुधीर कदम, सचिन पाटील, डॉ. दिलीप कुलकर्णी, महादेव माने, नामदेव माळी, संजय पाटील, प्रतिभा जगदाळे, डॉ. दिलीप शिंदे आदी उपस्थित होते.
आजच्या कवींचे वाचन कमी
आजचे कवी विविध माध्यमातून आपल्या कविता सादर करीत असले तरी, काही तरूण कवींचा अपवाद वगळता आजची कविता आशयाच्यादृष्टीने कमकुवत आढळते. नव्या कवींचे वाचन कमी होत असल्याने त्यांच्या कवितेतही ते जाणवत असल्याचेही पाटील यांनी सांगितले.