बोरगावात उपसरपंच निवडीवेळी तुंबळ हाणामारी; सदस्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:27 AM2021-03-05T04:27:02+5:302021-03-05T04:27:02+5:30
कवठेमहांकाळ : बोरगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे उपसरपंच निवडीवेळी राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील व भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांच्या ...
कवठेमहांकाळ :
बोरगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे उपसरपंच निवडीवेळी राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील व भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांच्या गटांत तुंबळ हाणामारी झाली. दोन्ही गटांकडून काठ्या, गजांचा वापर होऊन दगडफेकही झाली. यात राष्ट्रवादी समर्थक सदस्य पांडुरंग जनार्दन काळे (वय ५७) यांचा मृत्यू झाला, तर युवक राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष गणेश पाटील यांच्यासह भाजपचा कार्यकर्ता गंभीर जखमी असून, पाच ते सहा कार्यकर्ते किरकोळ जखमी झाले.
ही घटना गुरुवारी एक ते दीडच्या दरम्यान घडली.
बोरगाव ग्रामपंचायतीमध्ये ११ पैकी आठ सदस्य भाजपचे, तर तीन सदस्य राष्ट्रवादीचे आहेत. लोकनियुक्त सरपंच राष्ट्रवादी समर्थक आहेत.
भाजपचे उपसरपंच नामदेव पाटील यांनी कार्यकाल पूर्ण झाल्याने राजीनामा दिला होता. या रिक्त पदासाठी ग्रामपंचायतीत विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. आमदार पाटील गटाने खासदार पाटील गटाचे दोन सदस्य फोडून सहलीवर नेले होते. लोकनियुक्त सरपंच, फोडून नेलेले दोघे आणि राष्ट्रवादीचे तीन असा मेळ करून राष्ट्रवादीचा उपसरपंच करण्याची रणनीती आमदार गटाची होती.
दुपारी एक ते दीडच्या दरम्यान मतदानाला हजर होण्यासाठी पांडुरंग काळे यांच्यासह राष्ट्रवादीचे इतर सदस्य ग्रामपंचायतीकडे येत होते. यावेळी दोन्ही गट आमनेसामने आले आणि दगडफेकीला सुरुवात झाली. काठ्या, गज, हॉकी स्टिक घेऊन दोन्ही गट एकमेकांवर तुटून पडले. तुफान हाणामारी झाली. यामध्ये काठ्यांचा जबर मार लागल्याने पांडुरंग काळे यांना तातडीने उपचारासाठी सांगलीकडे नेण्यात आले. मात्र, वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. यात राष्ट्रवादीचे गणेश पाटील गंभीर, तर पाच ते सहा कार्यकर्ते किरकोळ जखमी झाले आहेत.
खासदार गटाचाही एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्यांच्यावर मिरज येथे उपचार सुरू आहेत.
या घटनेने कवठेमहांकाळ आणि तासगाव तालुक्यांत खळबळ माजली आहे.
रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. संशयितांना पकडण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत.
चौकट
गटातून फुटले आणि जीवाला मुकले!
मृत पांडुरंग काळे खासदार पाटील गटाकडून निवडून आले होते. मात्र, उपसरपंच निवडीत ते फुटून राष्ट्रवादीच्या गोटात सहभागी झाले होते. राष्ट्रवादीचे इतर सदस्य व कार्यकर्त्यांसमवेत ते सहलीलाही गेले होते. याचा राग खासदार गटामध्ये खदखदत होता. त्यामुळे हाणामारीवेळी त्यांना लक्ष्य करण्यात आल्याची चर्चा गावात होती.
चौकट
मोठा पोलीस बंदोबस्त
घटनास्थळी पोलीसप्रमुख दीक्षित गेडाम यांनी तातडीने भेट दिली. संशयितांना तातडीने अटक करण्याच्या सूचना दिल्या. तसेच नागरिकांना कायदा व सुव्यवस्थेचे पालन करण्याचे आवाहन केले. बोरगावमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
चौकट
प्रचंड तणाव
बोरगावमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह भाजपचा एक कार्यकर्ताही गंभीर आहे. त्यांच्यावर मिरज येथे अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.