अत्याचारप्रकरणी भोंदूस १२ वर्षे सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 12:11 AM2019-11-30T00:11:05+5:302019-11-30T00:11:31+5:30
सांगली : करणी काढण्याचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी एकास बारा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा न्यायालयाने ...
सांगली : करणी काढण्याचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी एकास बारा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा न्यायालयाने सुनावली. अब्दुलराही मुसा शेख (वय ३६, रा. बीड) असे आरोपीचे नाव आहे. त्याने पीडित मुलीला मिरजेतून पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केला होता. मिरज पोलिसांनी पीडित मुलीसह आरोपीस अलाहाबाद रेल्वेस्थानकावर पकडले होते.
खटल्याबाबतची माहिती अशी, आॅगस्ट २०१३ मध्ये हा प्रकार घडला होता. फिर्यादी मिरज येथील रहिवासी असून, त्याचा पत्नी व कुटुंबातील व्यक्तींशी वारंवार वाद होत असे. हे वादावादीचे प्रकार त्याने तडसर येथील नातेवाईकास सांगितले होते. त्यावर, तुझ्या बायकोवर कोणी तरी करणी केली असणार, त्यामुळे ती अशी वागत आहे. त्यावर उपाय केल्यास ती व्यवस्थित वागेल, असे नातेवाईकाने सांगितले. त्याच्या संपर्कातील आरोपी शेख हा करणी काढण्याचे काम करतो, असे सांगून, त्याला बोलावून घेतले होते.
यावेळी फिर्यादीची भाची सुटीसाठी आलेली होती. आरोपी शेख याने पीडित मुलीसही करणी बाधा झाल्याचे सांगून, ती काढली पाहिजे असे सांगितले. १८ आॅगस्ट २०१३ रोजी तो मिरज येथे आला होता. यावेळी आरोपी शेख याने फिर्यादीच्या कुटुंबातील सर्वांना एका खोलीत बसवून, मी बोलाविल्याशिवाय बाहेर येऊ नका, असे सांगितले. मात्र, बराचवेळ झाला तरी त्याने बोलावले नाही. त्यामुळे संशय आल्याने आत जाऊन पाहिले असता, आरोपी शेख व पीडित मुलगी घरात नसल्याचे दिसून आले. त्यांचा शोध घेतला असता, ते मिळून न आल्याने आरोपी शेखविरोधात मिरज शहर पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली होती.
दरम्यानच्या कालावधित शेखने या मुलीला पुणे व तेथून औरंगाबाद येथील नातेवाईकाकडे नेऊन तिथे त्याने मुलीवर अत्याचार केला होता. त्यानंतर मुलीला घेऊन तो मनमाड व अलाहाबाद येथून दरभंगाला जात असताना मिरज पोलिसांनी त्यास मुलीसह ताब्यात घेतले होते. मुलीने, आपणास पळवून नेऊन अत्याचार केल्याचे पोलिसांना सांगितले.
सरकार पक्षातर्फे दहा साक्षीदार
या गुन्ह्याचा तपास करून आरोपी शेखविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. सरकार पक्षातर्फे १० साक्षीदार तपासण्यात आले व साक्षी-पुराव्यांच्या आधारे आरोपीस शिक्षा सुनावण्यात आली. अतिरिक्त सत्रन्यायाधीश उज्ज्वला नंदेश्वर यांनी ही शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अॅड. माधव कुलकर्णी यांनी काम पाहिले.