‘पिनॉमिक’च्या विपुल पाटीलसह चौघे न्यायालयात शरण, शेअर मार्केटच्या नावाखाली ३५० कोटींचा घोटाळा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2023 04:10 PM2023-02-01T16:10:50+5:302023-02-01T16:11:20+5:30
गुन्हा दाखल होताच संशयित पसार झाले होते
सांगली : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून त्यातून तब्बल ३५० कोटी रुपयांचा घोटाळा करून पसार झालेले पिनॉमिक ट्रेडर्स या कंपनीचा संचालक विपुल पाटील याच्यासह अन्य चौघे मुंबई उच्च न्यायालयात शरण गेले. पाटील याच्यासह संतोष घोडके, सुधाकर पाटील व अभिजित जाधव (सर्व रा. तासगाव) अशी संशयितांची नावे आहेत.
दरम्यान, न्यायालयाने या सर्वांना ३० जानेवारीपासून बुधवारपर्यंत आर्थिक गुन्हे शाखेत हजेरी लावण्याचे आदेश दिले आहेत. संशयितांच्या अटकपूर्व जामिनावर मंगळवार दि. ७ फेब्रुवारी सुनावणी होणार आहे.
गुंतवणुकीनंतर जादा मोबदला देण्याच्या आमिषाने पिनॉमिक कंपनीच्या माध्यमातून सांगलीसह अन्य जिल्ह्यातील गुंतवणूकदारांनी पैसे गुंतवले होते. रकमेला दहा महिन्यात दामदुप्पट परतावा देण्याचेही सांगितले होते. यात हजारो तक्रारी दाखल झाल्या होत्या. याव्दारे ३५० कोटींचा गंडा घालण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच संशयित पसार झाले होते. इतक्या मोठ्या रकमेचा घोटाळा असल्याने आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास होता.
यानंतर विपुल पाटीलसह अन्य संशयितांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. यावर सुनावणी होत सर्वांना सांगलीत आर्थिक गुन्हे शाखेकडे तीन दिवस हजेरी लावण्याचे आदेश देण्यात आले. याशिवाय पोलिसांना तपासात सहकार्य करण्याचेही सूचित करण्यात आले आहे. या सर्वांच्या अटकपूर्व जामिनावर आता ७ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे.