शिराळ्यात ‘ठरलंय’चं वारं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 12:11 AM2019-06-26T00:11:24+5:302019-06-26T00:11:56+5:30

‘आम्ही ठरवलंय!’, ‘आमचं ठरलंय!’, ‘आमचं फिक्स आहे!’, ‘आमचं जनतेनं ठरवलंय!’ या चार घोषवाक्यांची शिराळा विधानसभा मतदारसंघात जोरदार चर्चा सुरू आहे. चार प्रमुख नेत्यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी मतदारसंघात फलक लावून,

Viral 'has decided' | शिराळ्यात ‘ठरलंय’चं वारं!

शिराळ्यात ‘ठरलंय’चं वारं!

Next
ठळक मुद्देविधानसभेची चर्चा : नाईक-देशमुखांसह महाडिक गटाकडूनही हवा

विकास शहा ।
शिराळा : ‘आम्ही ठरवलंय!’, ‘आमचं ठरलंय!’, ‘आमचं फिक्स आहे!’, ‘आमचं जनतेनं ठरवलंय!’ या चार घोषवाक्यांची शिराळा विधानसभा मतदारसंघात जोरदार चर्चा सुरू आहे. चार प्रमुख नेत्यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी मतदारसंघात फलक लावून, तसेच सोशल मीडियावरून जणू प्रचारच सुरू केला आहे. या निवडणूक प्रचारामुळे तीन महिने अगोदरच निवडणुकीचे वातावरण तयार झाले आहे.

शिराळा मतदारसंघ कायम चर्चेचा विषय ठरला आहे. भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक यांच्या कार्यकर्त्यांनी ‘आमचे फिक्स आहे!’, माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या कार्यकर्त्यांनी ‘आमचं जनतेनं ठरवलंय!’, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख यांच्या कार्यकर्त्यांनी ‘आमचं ठरलंय!’, तर महाडिक युवा शक्तीचे सम्राट महाडिक यांच्या कार्यकर्त्यांनी ‘आम्ही ठरवलंय!’ अशी घोषवाक्ये घेऊन रान उठवले आहे.

लोकसभा निवडणुकीपासून या चार नेत्यांनी लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. संपूर्ण विधानसभा मतदारसंघात या चारही नेत्यांनी गाठीभेटींचा धडाका लावला आहे. शिराळा तालुक्यात नाईक-नाईक-देशमुख घराण्यात विधानसभा लढवली जाते, हे आतापर्यंतचे चित्र आहे. आजवर मानसिंगराव नाईक, शिवाजीराव नाईक, सत्यजित देशमुख आपापल्या सोयीप्रमाणे एकमेकांशी लढले. कोणतेही दोन गट एकत्र आले की, तिसऱ्याचा पराभव, हे आजवरचे सूत्र राहिले आहे. मात्र लोकसभेला एकत्र आलेले नेतेच आता विधानसभेला एकमेकांच्या विरोधात लढतील, अशी परिस्थिती आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी झाली, तर शिराळा कोणाच्या वाटणीला, सत्यजित देशमुख व मानसिंगराव नाईक यांची भूमिका काय असेल, असे प्रश्न आहेत.

भाजपने आपणाला तिकीट द्यावे, अशी सम्राट महाडिक यांची मागणी आहे. अन्यथा नारायण राणे यांच्या ‘स्वाभिमान’चा पर्याय आहेच, तसे राणे कुटुंबीयांनी शिराळा येथे बोलून दाखवले आहे.
लोकसभेला धैर्यशील माने यांच्या प्रचाराच्या निमित्ताने अभिजित पाटील व सम्राट महाडिक शिवाजीराव नाईक यांच्यासोबत प्रचारात सहभागी झाले होते. राजू शेट्टींच्या प्रचारासाठी मानसिंगराव नाईक व सत्यजित देशमुख यांनी पायाला भिंगरी बांधून लोकसंपर्कावर भर दिला. विधानसभेच्या निमित्ताने हे सर्व नेते एकमेकांपुढे उभे ठाकल्याचे दिसल्यास नवल नाही.

तिकीट कोणाला : भाजपपुढे प्रश्न
भाजपसमोर तिकीट कोणाला द्यायचे, असा प्रश्न आहे. कारण ज्याला तिकीट मिळणार नाही, त्याची बंडखोरी होणार, हे निश्चित आहे. शिवसेनेचे नेते चिकुर्डे येथील अभिजित पाटील व शिराळ्याचे अ‍ॅड. भगतसिंग नाईक यांनीही विधानसभेसाठी इच्छुक असल्याचे शिराळा येथील आदित्य ठाकरे यांच्या सभेत जाहीर केले आहे.

Web Title: Viral 'has decided'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.