सांगलीत बहुजन क्रांतीचा विराट मोर्चा
By admin | Published: January 20, 2017 12:51 AM2017-01-20T00:51:46+5:302017-01-20T00:51:46+5:30
लाखोंची उपस्थिती : मराठा जातीला बहुजनांपासून तोडण्याचे षङयंत्र - वामन मेश्राम
सांगली : ‘एकच पर्व, बहुजन सर्व’ असा नारा देत भगवे, हिरवे, निळे, पिवळे ध्वज फडकवीत शेकडो संघटनांच्या सहभागाने गुरुवारी सांगलीत बहुजन क्रांती मोर्चाचे विराट दर्शन घडले. चार तासांहून अधिक काळ चाललेल्या मोर्चासाठी लाखो कार्यकर्ते आले होते. यावेळी बहुजन एकजुटीचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
अॅट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, ओबीसींच्या आरक्षणास धक्का न लावता मराठा समाजास आरक्षण द्यावे, मुस्लिम पर्सनल लॉमध्ये बदल करू नयेत यांसह विविध ३८ मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. सकाळी साडेनऊपासून सांगलीच्या आझाद चौकात कार्यकर्ते गोळा होत होते. कामगार भवनपासून सकाळी साडेअकराला मोर्चास सुरुवात झाली. विविध पक्ष, संघटना, समाजाचे ध्वज फडकवत जिल्हाभरातील लाखो कार्यकर्ते यात सहभागी झाले होते. कॉँग्रेस भवन, राम मंदिर, जिल्हा परिषदमार्गे मोर्चा पुष्पराज चौकात आला. तेथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. पुष्पराज चौकासह राम मंदिर-जिल्हा परिषद परिसर आणि सांगली-मिरज रस्ता गर्दीने फुलून गेला होता. आझाद चौक ते पुष्पराज चौकापर्यंत केवळ उसळलेला जनसागर दिसत होता. पुष्पराज चौकाकडे येणाऱ्या सर्वंच रस्त्यांवर गर्दी दाटली होती.
मोर्चाच्या सांगतेवेळी भारत मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष वामन मेश्राम म्हणाले की, मराठा समाज बहुजनांचा मोठा भाऊ आहे; मात्र फडणवीस सरकारने मराठा विरुद्ध बहुजन असे चित्र निर्माण करण्याचे षङयंत्र रचले. यापूर्वीच मंडल आयोगाच्या निमित्ताने संघाने ओबीसी आणि मराठा समाजात भांडण लावण्याचा प्रयत्न केला होता. आता पुन्हा तोच प्रयत्न सुरू आहे. फडणवीस सरकारचे व मनुवादी शक्तींचे षङयंत्र आम्ही उधळवून लावू. केवळ मोर्चे काढून आता प्रश्न सुटणार नाहीत. मोर्चांमधून काहीतरी निष्पन्न झाले पाहिजे. लवकरच चार हजार गावांमध्ये बहुजन क्रांती मोर्चाच्या शाखा उभारणार आहोत.
सभेवेळी हजरत मौलाना खलील-उर-रहमान सज्जाद नोमानी, ‘उपरा’कार लक्ष्मण माने, मनजितसिंग, सुमय्या नोमानी, लिंगायत धर्मगुरू कोर्णेश्वरस्वामी, बौद्ध महाथेरो यश कश्यपायन, जयसिंगराव शेंडगे, अॅड. के. डी. शिंदे, प्रा. नामदेव करगणे, उपमहापौर विजय घाडगे, माजी महापौर विवेक कांबळे, नगरसेवक विष्णू माने, शेखर माने, शेवंता वाघमारे, बापू बिरू वाटेगावकर, अरुण खरमाटे, असिफ बावा, दत्तात्रय घाडगे,
सुरेश चिखले, शंकर लिंगे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
महिला, मुलींची
संख्या लक्षणीय
‘जय भीम’, ‘जय जिजाऊ’, ‘जय क्रांतिज्योती’, ‘एकच साहेब, बाबासाहेब’ अशा घोषणांनी मोर्चामार्ग दुमदुमून गेला होता. महिला, शाळकरी मुली, युवतींचीही संख्या लक्षणीय होती. पारंपरिक वेशभूषेत बहुसंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. शहरातील मोर्चाच्या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गांवरून वळविण्यात आली होती. त्यामुळे अन्य मार्गावरील वाहतुकीचा ताण वाढला होता. सकाळी दहापासून सायंकाळी साडेचारपर्यंत वाहतूक बंद होती.
पुरावे आहेत...
वामन मेश्राम म्हणाले की, संघाच्या काही लोकांनी मराठा आणि बहुजन यांच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न केला होता. प्रतिमोर्चे काढण्यासाठी आवश्यक ती सामग्री पुरविण्याचे आमिषही दाखविले होते. याचे आमच्याकडे पुरावे आहेत. आम्ही या आमिषाला बळी पडलो नाही. बहुजनांचे हे प्रतिमोर्चे नसून न्याय्य मागण्यांसाठी व एकजुटीसाठी उचललेले एक पाऊल आहे.