सांगली जिल्ह्यातील प्रस्थापित नेते हारले, ‘विशाल’सह कार्यकर्ते जिंकले
By हणमंत पाटील | Published: June 8, 2024 01:21 PM2024-06-08T13:21:09+5:302024-06-08T13:22:58+5:30
तासगाव, खानापूर, जतचा धक्कादायक निकाल
सांगली : सांगली लोकसभेच्या निवडणूक निकालाने विद्यमान आमदार, माजी आमदार व प्रस्थापित नेत्यांना धक्का दिला. दुष्काळी पट्ट्यातील तासगाव-कवठेमहांकाळ, खानापूर-आटपाडी, जत व मिरज पूर्व भागातील नेत्यांशिवाय केवळ कार्यकर्त्यांना सोबत घेऊन विशाल यांनी एक लाखाचे मताधिक्य घेतले. नेत्याशिवाय आपण अपक्ष उमेदवार निवडून आणू शकतो, हा आत्मविश्वास कार्यकर्त्यांना गवसला. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलणार आहे.
सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला असूनही लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांना उमेदवारी नाकारली. त्यामागील महाविकास आघाडी व महायुतीतील काही प्रस्थापित नेत्यांचे षडयंत्र सांगली जिल्ह्यातील जनतेने ओळखले. विशाल पाटील यांना तिकीट मिळविण्यासाठी दिल्ली, मुंबई व नागपूर दौरे करावे लागले. त्यानंतरही उद्धवसेनेने उमेदवारीचा हट्ट सोडला नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या दबावामुळे विशाल पाटील यांनी बंडखोरी करीत अपक्ष निवडणूक लढविली. त्यामुळे मतदारसंघात सहानुभूतीची लाट तयार झाली.
जिल्ह्यातील सर्वपक्षातील नेत्यांना सहानुभूतीच्या लाटेचा अंदाज येऊ लागला. मात्र, प्रस्थापित नेते कोणी महायुती आणि उर्वरित महाविकास आघाडी धर्मात अडकले. मात्र, कार्यकर्त्यांना हे रुचले नाही. त्यामुळे त्यांनी थेट बंडखोरी केलेल्या विशाल पाटील यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. त्याचा परिणाम जिल्ह्याच्या दुष्काळी पट्ट्यातील खानापूर-आटपाडी, तासगाव-कवठेमहांकाळ, जत व मिरज पूर्व भागातून दिसून आला.
खानापूर मतदारसंघात तिसऱ्या गटाचा उदय..
खानापूर-आटपाडी विधानसभेचे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे शिंदे गटाचे नेतृत्व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास बाबर यांच्याकडे आहे. तसेच, माजी आमदार ॲड. सदाशिव पाटील गटाचे नेतृत्व राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष ॲड. वैभव पाटील यांच्याकडे आहे. मात्र, हे दोन्ही नेते महायुतीसोबत आहेत. तसेच, आटपाडी तालुक्यातील माजी आमदार राजेंद्र देशमुख, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अमरसिंह देशमुख व विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर हेही महायुतीसोबत आहेत. मात्र, आपले नेते एकत्र असल्याचे कार्यकर्त्यांना रुचले नाही. त्यामुळे जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांचा तिसऱ्या गटाचा येथे उदय झाला आहे. या गटात बाबर व पाटील दोन्ही गटाचे कार्यकर्ते आहेत. या तिसऱ्या गटाने खानापूर-आटपाडी विधानसभेतून विशाल पाटील यांना १६ हजार ६५४ मताधिक्य दिले आहे.
विरोधकांच्या एकीने बालेकिल्ला ढासळला..
२०१४ व २०१९ या दोन्ही लोकसभा निवडणुकीत तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातून माजी खासदार संजय पाटील यांना सर्वाधिक मताधिक्य मिळाले होते. आमदार तुमचा म्हणजे सुमनताई पाटील आणि खासदार आमचा म्हणजे संजयकाका पाटील, हा पॅटर्न दोन्ही लोकसभा निवडणुकांना चालला. मात्र, संजयकाका यांचे पुत्र प्रभाकर पाटील हे विधानसभेला इच्छुक झाल्याने या पॅटर्नला धक्का बसला. त्यामुळे पारंपरिक विरोधक असलेला सुमन पाटील गट आणि माजीमंत्री अजितराव घोरपडे गटातील कार्यकर्ते एकत्र आले. या विरोधी गटाच्या एकीने जुना पॅटर्न मोडून काढला. त्यामुळे संजयकाका यांची तासगावच्या बालेकिल्ल्यातच ९ हजार ४११ मतांची पिछेहाट झाली.
जतला आजी-माजी आमदारांच्या एकीने बेकी..
जतचे काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत हे महाविकास आघाडीच्या उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारसभेत सहभागी असलेतरी त्यांचा छुपा पाठिंबा विशाल पाटील यांना होता. शिवाय भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत विशाल पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला. मात्र, जत तालुक्यातील आजी-माजी आमदार एकत्र येणे हे दुसऱ्या फळीतील नेते व कार्यकर्त्यांना रुचले नाही. त्यामुळे महायुतीतील भाजपच्या दुसऱ्या फळीतील नेते तम्मनगौडा पाटील, प्रकाश जमदाडे, डॉ. रवींद्र आरळे व संजयकुमार तेली यांनी कार्यकर्त्यांसह संजयकाका पाटील यांचा किल्ला लढविला. त्यामुळे सांगली लोकसभेच्या निवडणुकीत केवळ जत विधानसभेत संजयकाका यांना ६ हजार २११ मतांचे मताधिक्य मिळाले.