Sangli lok sabha result 2024: 'मैं हू ना' म्हणत विशाल पाटील यांचा एक लाखांच्या मताधिक्याने विजय
By हणमंत पाटील | Published: June 4, 2024 04:52 PM2024-06-04T16:52:46+5:302024-06-04T16:55:04+5:30
सांगली लोकसभा मतदारसंघात अपक्ष म्हणून निवडून येत घडविला इतिहास
सांगली: सांगली जिल्ह्यातील तडजोडीच्या (सेटलमेंट) राजकारणाला तडे देत, प्रस्थापित नेत्यांनी उमेदवारी डावलण्यासाठी लावलेल्या षडयंत्राचा दरवाजा फोडून अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा एक लाखांच्या मताधिक्याने बहुमताने विजय झाला. 'मैं हु ना' हा विशाल यांच्या प्रचारातील टॅग लाईन होती. सांगली लोकसभा मतदारसंघात अपक्ष खासदार म्हणून इतिहास घडवित विशाल पाटील यांचा दिल्लीस्वारीचा मार्ग मोकळा झाला आहे. निकालाच्या पहिल्या फेरीपासून काँग्रेस भवनासमोर कार्यकर्त्याचा जल्लोष सुरू होता.
राज्यभरात चर्चेत असलेल्या सांगली लोकसभा निवडणुकीच्या निकालाची सर्वांना उत्सुकता होती. सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला असूनही प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांना उमेदवारीसाठी डावलण्यात आले. त्याऐवजी जिल्ह्यात ताकत नसतानाही महाविकास आघाडीकडून उद्धवसेनेची उमेदवारी पैलवान चंद्रहार पाटील यांना देण्यात आली. विशाल पाटील यांना उमेदवारी डावलण्यामागे सांगलीतील काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपच्या काही नेत्यांचे तडजोडीचे राजकारण झाले. महाविकास आघाडीतील नेत्यांच्या षडयंत्राला आम्ही फसलो, अशी कबुली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगलीतील सभेत दिली. त्यामुळे जिल्ह्यातील षडयंत्राचे व तडजोडीचे राजकारण सांगलीच्या मतदारांनी उधळून लावले.
अपक्ष विजयी, कॉंग्रेसचा जल्लोष..
सांगलीचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे घराणे संपविण्यासाठी त्यांच्या वारसदारांना उमेदवारी डावलली, त्यामुळे जिल्ह्यात काँग्रेस अस्तित्वाचा प्रश्न आहे, अशा मुद्द्यांमुळे विशाल पाटील यांच्याविषयी सहानुभूतीची लाट जिल्हाभर तयार झाली. त्यामुळे गावागावात व गटातटात विखुरलेला काँग्रेस कार्यकर्ता प्रदेश कार्याध्यक्ष विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली एकवटला. त्यांनी विशाल पाटील यांना अपक्ष उमेदवारीसाठी आग्रह केला. नेत्या ऐवजी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक हाती घेतल्याने सहानभुतीची लाट तयार झाली. या लाटेत विरोधी भाजपचे खासदार संजय पाटील व चंद्रहार पाटील यांच्यासाठी दिग्गज नेत्यांचा पराभव झाला. अपक्ष विशाल पाटील हे विजयी झाले असलेतरी त्यांच्यामागे कॉंग्रेसचे कार्यकर्ते भक्कमपणे उभे राहिल्याने त्यांनी जल्लोष केला.
कार्यकर्ते जिंकले, नेते हारले..
विशाल पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहाने बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी लढविली. मात्र, वंचितचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर, माजी आमदार विलासराव पाटील व माजीमंत्री अजितराव घोरपडे हे वगळता एकाही नेत्याने विशाल पाटील यांच्यासाठी प्रचार सभा घेतली नाही. कॉंग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. विश्वजित कदम यांचा छुपा पाठिंबा असलातरी थेट तेही विशाल पाटील यांच्या प्रचारसभेला येऊ शकले नाहीत. अनेक नेत्यांना उघडपणे काम करण्याची इच्छा असूनही कोणी युतीधर्म तर कोणी आघाडी धर्म पाळण्यासाठी विशाल पाटील यांना जाहीर पाठिंबा देऊ शकले नाहीत. उलट जिल्ह्यातील विविध विधानसभा मतदारसंघातील नेते महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारासोबत, तर विशाल पाटील यांच्यामागे केवळ कार्यकर्ते भक्कमपणे होते. त्यामुळे विशाल पाटील यांच्या विजयामध्ये कार्यकर्ते जिंकले व नेते हारले अशी चर्चा आहे.