विशाल पाटील यांनी सांगलीतील नेत्या-नेत्यांमध्ये भांडणे लावली, संजय पाटील यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 05:42 PM2024-10-02T17:42:14+5:302024-10-02T17:43:36+5:30

संसदेत बोलबच्चन, कामात शून्य

Vishal Patil started a fight between leaders, Sanjay Patil criticizes | विशाल पाटील यांनी सांगलीतील नेत्या-नेत्यांमध्ये भांडणे लावली, संजय पाटील यांची टीका

विशाल पाटील यांनी सांगलीतील नेत्या-नेत्यांमध्ये भांडणे लावली, संजय पाटील यांची टीका

सांगली : जिल्ह्यात काँग्रेससह सर्वच पक्षांमधील नेत्यांमध्ये भांडणे लावण्याचा उद्योग खासदार विशाल पाटील यांनी सुरू केला आहे. रंग बदलणाऱ्या सरड्यालाही लाजविणारी त्यांची राजकीय भूमिका आहे, अशी खरमरीत टीका माजी खासदार संजय पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.

तासगाव-कवठेमहांकाळमध्ये विशाल पाटील यांनी एका बाजूला अजितराव घोरपडेंना पाठिंबा दिला, तर काही तासातच रोहित पाटील यांच्या समर्थनाची भूमिका घेतली. खानापूरमध्ये सुहास बाबर व वैभव पाटील यांना स्वतंत्रपणे भेटून वेगवेगळ्या भूमिका मांडल्या. जतमध्ये विलासराव जगताप यांची सलगी करून विक्रम सावंत यांच्याविरोधात भूमिका घेतली. सांगलीत पृथ्वीराज पाटील व जयश्रीताई पाटील यांच्यात संघर्ष निर्माण करून स्वार्थी भूमिका घेतली. विश्वजित कदम यांना नेता मानायचे अन् त्यांना अडचणीत आणण्याचा उद्योगही करायचा, अशा भूमिका ते घेत आहेत, असा आरोप पाटील यांनी केला.

ते म्हणाले, बेताल वक्तव्य करण्याचे उद्योग त्यांनी बंद न केल्यास त्यांचा संस्थात्मक भ्रष्टाचार बाहेर काढू. वसंतदादा कारखान्यापासून प्रकाश अॅग्रो, दूध संघ, मका उद्योग, सूतगिरणी कामगारांची संस्था अशा अनेक संस्थांमध्ये त्यांनी केलेले उद्योग जनतेसमोर मांडू. भ्रष्टाचाराची पार्श्वभूमी असताना केवळ जाती-धर्माच्या दुहीतून व अपघाताने ते खासदार झाले आहेत. उपकाराची जाणीव ठेवणारा माणूस सोयीने कधी भूमिका बदलत नसतो. मात्र, विशाल पाटील यांनी प्रत्येक पावलाला भूमिका बदलण्यास सुरुवात केली आहे.

संसदेत बोलबच्चन, कामात शून्य

संसदेत बोलबच्चनगिरी केली म्हणून खासदारकीची जबाबदारी संपत नाही. जनतेच्या प्रश्नांसाठी मैदानात उतरावे लागते. खासदार झाल्यापासून एकदाही ते जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर आल्याचे दिसले नाही, अशी टीका संजय पाटील यांनी केली.

चाळीस वर्षाचा हिशेब द्या

विशाल पाटील यांच्या घरात चाळीस वर्षे खासदारकी आहे. मात्र, कामाच्या बाबतीत त्यांची पाटी कोरीच आहे. त्यामुळे त्यांनी चाळीस वर्षाचा हिशेब घेऊन समोर यावे. मी दहा वर्षाचा हिशेब घेऊन आमने-सामने यायला तयार आहे. हिंमत असेल तर विशाल पाटील यांनी त्याची तयारी दाखवावी, असे आव्हान संजय पाटील यांनी दिले.

भावना व सहानुभूतीचे राजकारण

केवळ सहानुभूती व भावनेच्या जोरावर राजकारण करण्याचे काम रोहित पाटील करीत आहेत. स्वकर्तृत्व त्यांनी सिद्ध करावे. अशा कोणत्याही गोष्टी त्यांच्याकडे नाहीत, अशी टीका पाटील यांनी केली.

Web Title: Vishal Patil started a fight between leaders, Sanjay Patil criticizes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.