बंडखोर वसंतदादांचा नातू का रडतो आहे..?
By वसंत भोसले | Published: April 18, 2024 12:15 PM2024-04-18T12:15:20+5:302024-04-18T12:15:52+5:30
डॉ. वसंत भोसले, संपादक लोकमत कोल्हापूर. लोकसभा निवडणुकीचे घमासान चालू आहे. अशा वातावरणात जागावाटप उमेदवारी जाहीर होणे आणि अर्ज ...
डॉ. वसंत भोसले,
संपादक लोकमत कोल्हापूर.
लोकसभा निवडणुकीचे घमासान चालू आहे. अशा वातावरणात जागावाटप उमेदवारी जाहीर होणे आणि अर्ज दाखल करणे याच्या जोरदार घडामोडी महाराष्ट्रात चालू आहेत. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा हा सामना होत आहे. जागा वाटपाच्या राजकारणाने गाजत आहेत. त्यामध्ये सांगली, सातारा आणि नाशिक या तीन जागांचा समावेश आहे. सांगलीची जागा काँग्रेसला हवी आहे. कारण सांगलीची जागा नेहमी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तो बालेकिल्ला बनवणारे कर्ते करविते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील हे आहेत.
शेतकऱ्यांचे नेते आणि सहकारी संस्थांचे अध्वर्यू अशी त्यांची प्रतिमा होती. जेमतेम शिक्षण असले तरी दादांचा अनुभवाचा आणि सर्वसामान्य ज्ञानाचा खूप मोठा प्रभाव होता. ते स्वातंत्र्य सेनानी होते. सांगलीचा जेल फोडून त्यांनी इंग्रज सरकारला आव्हान दिले होते. तेव्हा झालेल्या गोळीबारामध्ये ते जखमीदेखील झाले आणि त्यांचे दोन सहकारी धारातीर्थी पडले होते.
वसंतदादा पाटलांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्ह्यामध्ये सहकारी चळवळीची पाळीमुळे रुजविण्यात आल्याने पक्षही गावागावांत घट्ट मुळे धरून होता. त्यामुळे १९८० ते २००९ पर्यंत झालेल्या अकरा लोकसभा निवडणुकीमध्ये (त्यामध्ये दोन पोटनिवडणुकांचा समावेश आहे) सर्व निवडणुका वसंतदादा पाटील यांच्या घराण्यातील व्यक्तींनीच लढविल्या आणि तेच विजयी झाले. शालिनीताई पाटील, प्रकाशबापू पाटील, मदन पाटील आणि प्रतीक पाटील यांचा त्यामध्ये समावेश आहे. असा हा बालेकिल्ला काँग्रेसच्या दृष्टीने अपराजित होता.
मात्र, २०१४ मध्ये त्याला घरघर लागली. तत्कालीन भाजपचे स्टार प्रचारक आणि पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची सांगलीत सभा झाली. त्या आलेल्या लाटेमध्ये संजयकाका पाटील निवडून आले. प्रतीक पाटील यांचा पराभव झाला. म्हटले तर ते आक्रीत घडले होते, पण त्याला जे जे काँग्रेसचे उमेदवार निवडून आले होते, त्यांचा कारभारदेखील कारणीभूत होता. आताची निवडणूक अठरावी आहे. या निवडणुकीत महाआघाडीतर्फे काँग्रेसने दावा सांगितला होता.
काँग्रेस पक्षाने विशाल पाटील यांना उमेदवारी देण्याचे ठरवले होते. मात्र, जागा वाटपामध्ये सांगलीवर शिवसेनेने हक्क सांगितला. केवळ हक्क सांगितला नाही, तर तातडीने हालचाली करून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील या नवख्या तरुणाला शिवसेनेने पक्षात प्रवेश दिला. त्याला उमेदवारी दिली आणि एवढेच नव्हे तर पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे खास सांगलीला आले आणि मिरजेत मोठी सभा घेऊन टाकली. त्या सभेत चंद्रहार पाटील हा तरुण पैलवान दिल्लीचे तख्त काबीज करेल, असे जाहीर करून टाकले.
वास्तविक शिवसेनेचा या लोकसभा मतदारसंघामध्ये प्रभाव नाही. हे सर्व घडत असतानादेखील काँग्रेसचे माजी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली विशाल पाटील उमेदवारी मिळविण्यासाठी मुंबई आणि दिल्लीच्या वाऱ्या करीत होते. काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागत होते. एकेकाळी वसंतदादा पाटील यांच्या घराण्यातून कोण लढणार आहे एवढेच विचारले जायचे आणि त्यांना उमेदवारी मिळायची. उमेदवार कोण असावा याचा निर्णय वसंतदादा घराण्याने घ्यावा आणि काँग्रेसने त्याच्यावर शिक्कामोर्तब करावे, अशी परिस्थिती होती. आता वातावरण बदलले. वसंतदादा पाटील यांच्या घराण्यातील वारसदाराला उमेदवारीसाठी दारोदार फिरावे लागत आहे. ही खंत त्यांनी काल उमेदवारी अर्ज भरताना झालेल्या सभेत बोलून दाखविली आणि एक राजकीय इतिहासाचा पदर त्यांनी उलगडून दाखवला.
वसंतदादा पाटील आणि जिल्ह्यातील दुसरे ज्येष्ठ नेते राजारामबापू पाटील यांच्यातील वादाची किनार या सर्व घडामोडीला कारणीभूत आहे, हे स्पष्टपणे विशाल पाटील यांनी सूचित केले. दादा-बापू यांचे भांडण केव्हाच संपले आहे. आता ते तुम्हीसुद्धा संपवा साहेब अशी आर्त हाक त्यांनी राजारामबापू पाटील यांचे चिरंजीव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना दिली. याचाच अर्थ सांगलीची जागा काँग्रेसला मिळू नये आणि वसंतदादा पाटील यांच्या घराण्यातील उमेदवाराला निवडणूक लढता येऊ नये अशा केलेल्या राजकीय कूरघोडीचा भाग होता हे आता उघड झालेले आहे. हे सांगताना विशाल पाटील रडत होते, त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते.
वसंतदादा पाटील यांनी राजकीय संघर्षात नेहमीच बंडाची भूमिका घेतली, अशा बंडखोरांच्या नातवाची अशी अवस्था का झाली? याचा विचार त्यांनी केला पाहिजे आणि महाविकास आघाडीचे राजकारण महाराष्ट्रात यशस्वी करण्यासाठी आम्ही लढतो आहोत, अशी भूमिका मांडणारे जयंत पाटील यांनीदेखील सांगलीत काँग्रेसला अडचणीत आणून काय साध्य केले? हे एकदा त्यांनी स्पष्ट करावे. कारण या सर्व राजकीय कूरघोडीमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनामध्ये जयंत पाटीलच खलनायक आहेत हे अधोरेखित झाले आहे.