ज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर यांना विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर
By संतोष भिसे | Published: September 22, 2022 01:44 PM2022-09-22T13:44:06+5:302022-09-22T13:45:47+5:30
सांगलीत नाट्यविद्यामंदिर समितीतर्फे अध्यक्ष डॉ. शरद कराळे यांनी गुरुवारी ही घोषणा केली.
सांगली : ज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर यांना यंदाचे विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर करण्यात आले आहे. सांगलीत नाट्यविद्यामंदिर समितीतर्फे अध्यक्ष डॉ. शरद कराळे यांनी गुरुवारी ही घोषणा केली. रंगभूमीदिनी, ५ नोव्हेंबररोजी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष डाॅ. जब्बार पटेल यांच्याहस्ते पदक प्रदान केले जाईल.
पुरस्काराचे यंदाचे ५५ वे वर्ष आहे. यापूर्वी २०१९ मध्ये ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना पुरस्कार देण्यात आला होता. त्यानंतरच्या दोन वर्षांत कोरोना व लॉकडाऊनमुळे गौरव सोहळा होऊ शकला नाही. यावर्षी सार्वजनिक कार्यक्रमांवरील निर्बंध हटल्याने पुरस्कार सोहळ्याचे नियोजन करण्यात आले. डॉ. कराळे यांच्या अध्यक्षतेखालील पुरस्कार समितीने पदकासाठी आळेकर यांची एकमताने निवड केली. परंपरेनुसार नाट्यसंमेलनाच्या विद्यमान अध्यक्षांच्या, म्हणजे डॉ. जब्बार पटेल यांच्याहस्ते पदक प्रदान केले जाईल. गौरव पदक, रोख २५ हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
नाट्यक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या रंगकर्मीला आद्यनाटककार विष्णुदास भावे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ प्रतिष्ठेचे भावे गौरव पदक देऊन सन्मानित केले जाते. आळेकर यांनी नाटककार, दिग्दर्शक, अभिनय, पटकथा लेखन या क्षेत्रात मुक्त मुशाफिरी केली आहे. विविध नाट्यसंस्थांशी संबंधित आहेत. केंद्र शासनातर्फे पद्मश्री आणि राज्य शासनातर्फे जीवनगौर पुरस्काराने सन्मानित झाले आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय सन्मानवृत्तीसाठीही त्यांची निवड झाली आहे. पत्रकार बैठकीला समितीचे कार्यवाह विलास गुप्ते, कोषाध्यक्ष मेघाताई केळकर यांच्यासह जगदिश कराळे, आनंदाव पाटील, बलदेव गवळी, प्राचार्य डाॅ. भास्कर ताम्हणकर, विवेक देशपांडे, बीना साखरपे, भालचंद्र चितळे आदी उपस्थित होते.