Sangli: भांडणास कारणीभूत ठरत असल्याचा राग, विश्रामबागला वृद्धेचा तरुणाकडून खून; हल्लेखोर ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 03:35 PM2024-08-16T15:35:05+5:302024-08-16T15:37:02+5:30
सांगली : घरामध्ये भांडणे होण्यास कारणीभूत ठरत असल्याच्या संशयातून आक्काताई नागाप्पा उमरे (वय ७०, रा. कुंभार मळा, १७ वी ...
सांगली : घरामध्ये भांडणे होण्यास कारणीभूत ठरत असल्याच्या संशयातून आक्काताई नागाप्पा उमरे (वय ७०, रा. कुंभार मळा, १७ वी गल्ली) या वृद्धेचा शेजारील रोहित सतीश लठ्ठे (वय ३०, रा. कुंभार मळा सांगली) याने एडक्याने वार करून खून केला. बुधवारी दुपारी १२ च्या सुमारास हा प्रकार घडला. त्यानंतर उपचार सुरू असताना उमरे यांचा मृत्यू झाला. विश्रामबाग पोलिसांनी हल्लेखोर रोहितला अटक केली आहे. मृत उमरे यांचा मुलगा मल्लिकार्जून उमरे (रा. समतानगर, मिरज) याने फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी मल्लिकार्जून नागाप्पा उमरे हा पिकअप गाडी चालवतो. मिरजेत समतानगर येथे तो कुटुंबासह राहतो. तर आई आक्काताई या सांगलीतील कुंभार मळा परिसरात भाड्याने राहण्यास होत्या. त्यांच्या शेजारी जवळचा नातेवाईक संशयित हल्लेखोर रोहित लठ्ठे राहण्यास आहे. आक्काताई आणि रोहित यांच्यात काही महिन्यांपासून किरकोळ कारणावरून वारंवार वाद होत होते. आक्काताई यांच्यामुळे कुटुंबात भांडणे होतात, असा त्याला संशय होता.
आक्काताईमुळे भांडणे होत असल्यामुळे रोहित याने मल्लिकार्जून यांचा भाचा विजय पाटील यास दोन दिवसांपूर्वी फोन करून ‘तुझ्या आजीला घेऊन जा. ती आमच्या घरामध्ये भांडणे होत आहेत. तू तत्काळ तिला घेऊन जा, नाहीतर तिला जिवंत सोडणार नाही’ असे सांगितले होते.
दरम्यान बुधवार दि. १४ रोजी सकाळी ११:३० च्या सुमारास पुन्हा आक्काताई आणि रोहित यांच्यात वाद झाला. त्यातूनच रोहित याने आक्काताई यांच्यावर एडक्याने वार केले. कपाळावर, तोंडावर आणि हातावर वर्मी घाव बसल्याने रक्तस्त्राव झाला. आक्काताई गंभीर जखमी पडल्या. शेजारील राजू कोळेकर व मंगल सतीश लठ्ठे यांनी तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना दुपारी सव्वाच्या सुमारास आक्काताई यांचा गंभीर रक्तस्त्राव झाल्यामुळे मृत्यू झाला. पोलिसांनी दुपारी रोहित लठ्ठे यास ताब्यात घेतले आहे.
हल्लेखोर ताब्यात
विश्रामबाग पोलिसांना माहिती मिळताच निरीक्षक ईश्वर ओमासे आणि पथकाने घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. त्यानंतर तपासाच्या सूचना दिल्या. हल्ल्यानंतर संशयित रोहित पळून गेला होता. त्याला ताब्यात घेतले. तेव्हा तो नशेत असल्याचे दिसून आले. त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.