विश्रामबाग भाजी मंडईला प्रशासनाचा खोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:18 AM2021-06-24T04:18:26+5:302021-06-24T04:18:26+5:30
सांगली : विश्रामबाग परिसरात आमदार निधीतून नवीन भाजी मंडईचा प्रस्ताव तयार करण्यात होता. त्यासाठी आमदार सुधीर गाडगीळ यांनी पुढाकार ...
सांगली : विश्रामबाग परिसरात आमदार निधीतून नवीन भाजी मंडईचा प्रस्ताव तयार करण्यात होता. त्यासाठी आमदार सुधीर गाडगीळ यांनी पुढाकार घेतला.
पण प्रशासनाच्या दिरंगाईमुळे भाजी मंडईचे काम रखडले आहे, असा आरोप भाजपचे गटनेते विनायक सिंहासने यांनी केला आहे. शहरातील विश्रामबाग उपनगराचा मोठा विस्तार झाला आहे. या भागाची लोकसंख्या सुमारे दीड-दोन लाखांवर पोहोचली आहे. या परिसरात रस्त्यावर आठवडा बाजार भरत आहे. विक्रेते रस्त्यावर बसत असल्याने वाहतुकीलाही अडथळा होतो. त्यामुळे या परिसरात भाजी मंडई व्हावी, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून केली जात होती. महापालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले होते. आमदार गाडगीळ, शेखर इनामदार व आपण स्वत: पुढाकार घेऊन भाजी मंडईचा प्रस्ताव तयार करून प्रशासनाला सादर केला. मात्र, या प्रस्तावाला अद्याप मान्यता मिळालेली नाही. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे हे काम रखडले आहे. प्रशासनाने तत्काळ भाजी मंडईला मान्यता द्यावी अन्यथा या भागातील नागरिकांसह आंदोलन करण्याचा इशारा सिंहासने यांनी दिला आहे.
चौकट
जागेचा प्रश्न लालफितीत
विश्रामबाग येथील भाजी मंडईसाठी जागा निश्चित केली आहे. ही जागा नगरपालिकेच्या ताब्यात आहे. पण अद्याप त्यावर महापालिकेचे नाव लागलेले नाही. ही जागा नावावर करून घेण्याची तसदीही अजून प्रशासनाने घेतली नसल्याचा आरोप सिंहासने यांनी केला.