विश्वजीत कदम बिनविरोध, भाजपासह सर्व उमेदवारांचे अर्ज मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 07:14 AM2018-05-15T07:14:30+5:302018-05-15T07:15:50+5:30
कमालीची उत्कंठा वाढवणाऱ्या राजकीय नाट्यानंतर अर्ज माघारीसाठी शेवटची केवळ पंधरा मिनिटे बाकी असताना भाजपच्या संग्रामसिंह देशमुख यांचा उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.
सांगली : कमालीची उत्कंठा वाढवणाऱ्या राजकीय नाट्यानंतर अर्ज माघारीसाठी शेवटची केवळ पंधरा मिनिटे बाकी असताना भाजपच्या संग्रामसिंह देशमुख यांचा उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. याचवेळी विरोधातील सर्व आठ जणांनी माघार घेतल्याने विधानसभेच्या पलूस-कडेगाव मतदारसंघातील पोटनिवडणुकीत काँग्रेसचे विश्वजित कदम बिनविरोध निवडून आले.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनामुळे विधानसभेच्या पलूस-कडेगाव मतदारसंघात पोटनिवडणूक लागली होती. काँग्रेसने पतंगरावांचे पुत्र, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांना उमेदवारी दिली. विधानसभेच्या निवडणुकांना जेमतेम वर्षभराचा कालावधी उरल्याने ही निवडणूक बिनविरोध करावी, असे आवाहन काँग्रेसच्या नेत्यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत शिवसेना आणि राष्टÑवादीने उमेदवार न देण्याचा निर्णय घेऊन कदम यांना पाठिंबा जाहीर केला होता. भाजपने मात्र निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते. देशमुख यांनी बुधवारी शक्तिप्रदर्शनाने अर्ज दाखल केला होता.
अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवसाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. कदम यांच्याविरोधात संग्रामसिंह देशमुख यांच्यासह आठ जणांचे अर्ज होते. सोमवारी दुपारी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करून देशमुख यांचा अर्ज मागे घेत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर दुपारी पावणेतीन वाजता देशमुख यांच्यासह अपक्षांचे अर्ज मागे घेण्यात आले. त्यामुळे काँग्रेसचे विश्वजीत कदम बिनविरोध निवडून आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. विजयसिंह देशमुख यांनी जाहीर केले.
>विश्वजीत झाले भावुक
बिनविरोध निवडून आल्याचे समजताच विश्वजित कदम भावूक झाले. त्यांनी चुलते आमदार मोहनराव कदम यांची भेट घेऊन त्यांना मिठी मारली.
पतंगराव कदम यांच्या आठवणींनी त्यांचे डोळे अश्रूंनी डबडबले होते. गुलाल न उधळता आणि फटाके न वाजवता साधेपणाने हा विजय साजरा करण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
> विश्वजीत कदम यांचा अल्पपरिचय
अडतीस वर्षीय विश्वजीत कदम यांनी संगणक अभियांत्रिकीमध्ये पदवी तसेच बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये पदव्युत्तर पदवी (एम.बी.ए.) घेतली आहे.
हार्वर्ड विद्यापीठातून शिक्षण आणि व्यवस्थापन
(एम.एल.ई.) पूर्ण केले आहे. सध्या ते युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व भारती विद्यापीठाचे कार्यवाह आहेत. २०१४मध्ये त्यांनी पुण्यातून काँग्रेसकडून लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यात पराजय पत्करावा लागला होता.