‘यशवंत’ विकत घेण्यासाठी विश्वजीत कदमांचे अनिल बाबरांशी साटेलोटे, संजय विभुतेंचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2023 02:30 PM2023-04-21T14:30:34+5:302023-04-21T14:31:21+5:30
विटा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत विश्वजीत कदम यांनी प्रदेश काँग्रेसचा आदेश डावलून शिवसेना (शिंदे गट) व भाजपशी केली युती
दिलीप मोहिते
विटा (जि. सांगली) : नागेवाडीचा यशवंत साखर कारखाना विकत घेताना मिंधे गटाचे आमदार अनिल बाबर यांच्या नाराजीला सामोरे जावे लागू नये यासाठी काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांनी विटा बाजार समितीच्या निवडणूकीत महाविकास आघाडी तोडून मिंधे गट व भाजपची हातमिळवणी केली असल्याचा घणाघाती आरोप शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी शुक्रवारी विटा येथे पत्रकार परिषदेत केला. यावेळी त्यांनी प्रदेश कॉँग्रेसचा आदेश धुडकावून आ. कदम यांनी पक्षविरोधी युती केल्याची तक्रार करणार असल्याचेही सांगितले.
विटा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत अंतिम क्षणी काँग्रेसचे आ. विश्वजीत कदम यांनी महाविकास आघाडी करण्याबाबतचा प्रदेश काँग्रेसचा आदेश डावलून शिवसेना (शिंदे गट) व भाजपशी युती केल्यानंतर जिल्हाप्रमुख विभुते यांनी पत्रकार परिषद घेऊन आ. कदम यांच्यावर निशाणा साधला.
जिल्हाप्रमुख विभुते म्हणाले, विश्वजीत कदम यांचे ज्यांनी मंत्रीपद घालवून त्यांना माजी मंत्री केले, ज्यांनी तुम्हाला राज्याचे नव्हे तर तालुक्याचे नेते करून ठेवले तसेच ज्यांनी महाविकास आघाडीचे सरकार पाडले त्या मिंधे गट व भाजपशी तुम्ही हातमिळवणी केली. खऱ्या अर्थाने भाजप हाच काँग्रेसचा नंबर एकचा शत्रू आहे. तुम्ही स्वत:ला राज्याचे नेते म्हणवून घेता. पण इथल्या मिंधे गटाच्या आमदारांच्या दावणीला कायमच बांधलेल्या खानापूर तालुका काँग्रेस पदाधिकाºयांचे ऐकून तुम्ही प्रदेश काँग्रेसचा महाविकास आघाडीबाबतचा आदेश धुडकावला.
खानापूर काँग्रेसचे पदाधिकारी २४ तास इथल्या आमदारांच्या दारात पडून आहेत. त्यांनी तालुक्यात किती काँग्रेस वाढविली, याचा आढावा आ. कदम यांनी पहिल्यांदा घेतला पाहिजे होता. परंतु, तुम्हाला यशवंत कारखाना विकत घ्यायचा आहे आणि त्यासाठी इथल्या आमदारांचा विरोध व नाराजी नको म्हणून तुम्ही साटेलोटे करून सोयीचे राजकारण केले.
परंतु, तुम्ही केलेली युती तुम्हाला लखलाभ होवो. इथून पुढे तुमच्याबरोबर आमची कोणतीही आघाडी राहणार नाही. तुम्ही केलेल्या गद्दारीचा हिशोब आगामी काळात आमचे शिवसैनिक चुकता करतील. आम्ही आमचा अहवाल आमच्या पक्षश्रेष्ठीकडे व त्याची दुसरी प्रत कॉँग्रेस पक्षश्रेष्ठीकडेही पाठविणार आहे, असेही जिल्हा प्रमुख संजय विभुते म्हणाले.