महापुरानंतरही विश्वजित कदम कृष्णाकाठासोबत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 11:43 PM2019-09-01T23:43:58+5:302019-09-01T23:44:01+5:30
शरद जाधव । लोकमत न्यूज नेटवर्क भिलवडी : महापुराने उद्ध्वस्त झालेल्या पलूस तालुक्यातील पूरग्रस्तांचे संसार उभारण्यासाठी पलूस-कडेगावचे आमदार डॉ. ...
शरद जाधव ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भिलवडी : महापुराने उद्ध्वस्त झालेल्या पलूस तालुक्यातील पूरग्रस्तांचे संसार उभारण्यासाठी पलूस-कडेगावचे आमदार डॉ. विश्वजित कदम सरसावले आहेत. महापुरापूर्वी आणि नंतरही त्यांची मदत सुरूच आहे. पलूस तालुक्यातील पूरग्रस्त गावांतील १९ हजार कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या कीटचे वाटप करण्यात येत आहे.
डॉ. पतंगराव कदम यांचे पुत्र आमदार विश्वजित कदम हे वडिलांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार महापुरात पूरग्रस्तांसोबत पहिल्या दिवसापासून राहिले. भर पावसात पाण्यात जाऊन पूरग्रस्त नागरिक, महिला, मुले तसेच जनावरे कशी सुरक्षित बाहेर काढता येतील याची काळजी घेतली. बाहेर पडल्यानंतर भारती विद्यापीठ व परिवाराच्यावतीने पूरग्रस्तांना निवास, भोजन व आरोग्य सुविधा तात्काळ उपलब्ध करून दिल्या. सोनहिरा साखर कारखान्याने जनावरांसाठी चारा उपलब्ध करून दिला. आता महापूर ओसरल्यानंतर दगावलेली माणसे, जनावरे, पडलेली घरे, शेतीचे व उद्योगांचे झालेले नुकसान याची प्रत्येक गावात समक्ष भेट देऊन पाहणी केली. भारती विद्यापीठ, सोनहिरा साखर कारखान्याच्यावतीने स्वच्छता व आरोग्य सेवेमध्ये योगदान दिले आहे. राज्य शासनाकडून पूरग्रस्तांना ठोस मदत मिळाली पाहिजे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले.
सर्वच पूरग्रस्तांपर्यंत समान मदत पोहोचत नाही, त्यासाठी जादा मदतीची गरज असल्याचे ओळखून, त्यांनी ‘डॉ. पतंगराव कदम आपत्ती निवारण कक्ष’ स्थापन केला. त्यामध्ये भारती विद्यापीठ व संलग्न व्यक्ती, संस्थांनी मदत जमा केली. अंथरूण, पांघरूण, संसारोपयोगी साहित्य, भांडी, धान्य, कपडे असे दर्जेदार वस्तूंचे कीट बनविले. त्याचे गावनिहाय वेळापत्रक बनवून वाटप सुरू केले आहे.
पलूस तालुक्यातील भिलवडी, अंकलखोप, धनगाव, चोपडेवाडी, सुखवाडी, खटाव, ब्रम्हनाळ, वसगडे, नागठाणे, आमणापूर, विठ्ठलवाडी, संतगाव, सूर्यगाव, बुर्ली, नागराळे, पुणदी, दुधोंडी, घोगाव, तुपारी, दह्यारी आदी गावांमधील पूरग्रस्त कुटुंबांना ही मदत देण्यात येणार आहे.