विश्वजित कदम बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 12:19 AM2018-05-15T00:19:05+5:302018-05-15T00:19:05+5:30

Vishwajit step unconstitutional | विश्वजित कदम बिनविरोध

विश्वजित कदम बिनविरोध

googlenewsNext

सांगली : कमालीची उत्कंठा वाढविणाऱ्या राजकीय नाट्यानंतर अर्ज माघारीची मुदत संपायला केवळ पंधरा मिनिटे राहिली असताना भाजपच्या संग्रामसिंह देशमुख यांचा उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. याचवेळी विरोधातील सर्व सात जणांनी माघार घेतल्याने विधानसभेच्या पलूस-कडेगाव मतदारसंघातील पोटनिवडणुकीत काँग्रेसचे विश्वजित कदम बिनविरोध निवडून आले.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनामुळे विधानसभेच्या पलूस-कडेगाव मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली होती. काँग्रेसने पतंगरावांचे पुत्र, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांना उमेदवारी दिली होती. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवसाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. कदम यांच्याविरोधात संग्रामसिंह देशमुख यांच्यासह सातजणांचे अर्ज होते. अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी सोमवारी सकाळी पाच अर्ज मागे घेण्यात आले. दरम्यान, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कडेपूर येथे देशमुख यांच्या कार्यालयात कोअर कमिटीशी चर्चा केली.
आ. सुधीर गाडगीळ, मकरंद देशपांडे, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील, राजाराम गरूड यांच्यासह पृथ्वीराज देशमुख व संग्रामसिंह देशमुख यावेळी उपस्थित होते. त्यानंतर महसूलमंत्री पाटील यांनी देशमुख बंधूंशी बंद दाराआड अर्धा तास चर्चा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याशी दूरध्वनीवर बोलून शेवटी पुन्हा कोअर कमिटीची बैठक घेतली. त्यात अर्ज मागे घेण्यावर शिक्कामोर्तब झाले. दुपारी पावणेतीन वाजता महसूलमंत्री पाटील यांनी भाजपचा निर्णय जाहीर केला. एखाद्या नेत्याच्या निधनानंतर, तेथील पोटनिवडणुकीत भाजप कधी निवडणूक लढवत नाही, असा निर्वाळा देत महसूलमंत्री पाटील यांनी देशमुख यांचा अर्ज मागे घेण्याची घोषणा केली. कदम यांच्या विरोधातील अपक्षांचेही अर्ज मागे घेण्यात आले. त्यामुळे कदम बिनविरोध निवडून आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. विजयसिंह देशमुख यांनी जाहीर केले.
विधानसभेच्या निवडणुकांना जेमतेम वर्षभराचा कालावधी उरल्याने ही निवडणूक बिनविरोध करावी, असे आवाहन काँग्रेसच्या नेत्यांनी केले होते. शिवसेनेने आणि राष्टÑवादीने उमेदवार न देण्याचा निर्णय घेऊन कदम यांना पाठिंबा जाहीर केला होता. भाजपने मात्र निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते. ते दिवंगत माजी आमदार संपतराव देशमुख यांचे पुत्र, तर भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांचे चुलत बंधू आहेत. संपतराव देशमुख यांच्या अकाली निधनानंतर १९९६ मधील पलूस-कडेगावच्या पोटनिवडणुकीत पृथ्वीराज देशमुख यांच्याविरोधात पतंगराव कदम उतरले होते. त्यामुळे आता कदम यांच्या पश्चात होणारी पोटनिवडणूक भाजपने लढवावीच, असे कार्यकर्त्यांचे मत होते. दुसरीकडे जशास तसा निर्णय न घेता भाजपने आपली प्रतिमा उंचावण्यासाठी पोटनिवडणूक लढवू नये, असा सूर पक्षाच्या नेत्यांतून उमटत होता. देशमुख यांनी बुधवारी जिल्ह्णातील खासदार-आमदारांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शनाने अर्ज दाखल केला होता. त्यामुळे ते निवडणूक लढवतील असे वाटत होते. मात्र सोमवारी वरिष्ठ स्तरावरून अर्ज मागे घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.
विश्वजित झाले भावूक
विश्वजित कदम यांच्यासह कदम कुटुंबीय कडेगाव येथे सोनहिरा कारखान्याचे संचालक दीपक भोसले यांच्या निवासस्थानी थांबले होते. दुपारी तीन वाजता विश्वजित बिनविरोध आमदार झाल्याचे स्पष्ट झाले आणि कार्यकर्त्यांसह कदम कुटुंबीय भारावून गेले. डॉ. पतंगराव कदम यांच्या आठवणी जाग्या झाल्या आणि उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. विश्वजित कदम, आमदार मोहनराव कदम, डॉ. शिवाजीराव कदम, विजयमाला कदम, सौ. स्वप्नाली कदम यांच्यासह कदम कुटुंबीय व कार्यकर्ते आठवणींनी सद्गदित झाले. विश्वजित यांनी डॉ. पतंगराव कदम यांच्या समाधीस्थळी जाऊन दर्शन घेतले. यावेळी वातावरण भावूक झाले होते.


विश्वजित कदम यांचा अल्पपरिचय
अडतीस वर्षीय विश्वजित कदम यांनी संगणक अभियांत्रिकीमध्ये पदवी तसेच बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशनमध्ये पदव्युत्तर पदवी (एम.बी.ए.) घेतली आहे. त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून शिक्षण आणि व्यवस्थापन (एम.एल.ई.) पूर्ण केले आहे. सध्या ते युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व भारती विद्यापीठाचे कार्यवाह आहेत. भारती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासह विविध सहकारी संस्थांची जबाबदारी त्यांनी पेलली आहे. ते पुणे जिल्हा फुटबॉल संघाचे अध्यक्ष, तर वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत. २०१४ मध्ये त्यांनी पुण्यातून काँग्रेसकडून लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यात पराजय पत्करावा लागला होता.
शेवटच्या दहा मिनिटांत माघारीचा अर्ज
संग्रामसिंह देशमुख यांच्या उमेदवारी अर्जाला सुरेंद्र चौगुले सूचक होते. त्यांना दुपारी अडीचला प्रांताधिकारी कार्यालयाच्या आवारात जाऊन थांबण्यास सांगितले होते. कडेपूर येथे भाजपच्या कार्यालयात झालेला माघारीचा निर्णय त्यांना भ्रमणध्वनीवरून कळविण्यात आला. त्यांनी अंतिम मुदतीस दहा मिनिटे बाकी असताना म्हणजे २ वाजून ५० मिनिटांनी देशमुख यांची स्वाक्षरी असलेला माघारीचा अर्ज सादर केला.
मोहनराव कदम यांना अश्रू अनावर
विश्वजित कदम हे बिनविरोध आमदार झाले आणि आमदार मोहनराव कदम यांना त्यांनी कडकडून मिठी मारली. त्यावेळी दोघांनीही आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
यांनी घेतली माघार
भाजप : संग्रामसिंह देशमुख. अपक्ष : प्रमोद गणपतराव पाटील, सतीश सर्जेराव पाटील, मोहन विष्णू राऊत, अभिजित वामनराव आवाडे, बजरंग धोंडिराम पाटील. हिंदुस्थान जनता पार्टी : मिलिंद काशिनाथ कांबळे.
 

Web Title: Vishwajit step unconstitutional

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.