विश्वजित यांची नवी इनिंग सुरू, कडेगाव-पलूसच्या राजकारणाचा आणखी एक अध्याय; विरोधकांकडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 11:35 PM2018-04-06T23:35:12+5:302018-04-06T23:35:12+5:30

Vishwajit's new innings start, another chapter of Kathgaon-Palus politics; Attention to opponents | विश्वजित यांची नवी इनिंग सुरू, कडेगाव-पलूसच्या राजकारणाचा आणखी एक अध्याय; विरोधकांकडे लक्ष

विश्वजित यांची नवी इनिंग सुरू, कडेगाव-पलूसच्या राजकारणाचा आणखी एक अध्याय; विरोधकांकडे लक्ष

Next
ठळक मुद्देपोटनिवडणुकीचे वारे :

प्रताप महाडिक।
कडेगाव : युवक काँग्रेसच्या माध्यमातून राज्याच्या राजकारणात सक्रिय झालेल्या प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांच्या राजकीय कारकीर्दीची इनिंग पलूस-कडेगावच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने सुरू होत आहे. या मतदारसंघात पोटनिवडणूक बिनविरोध होणार, की येथे कदम-देशमुख यांच्यातील राजकीय सत्तासंघर्ष पुन्हा रंगणार, याबाबत मतदारसंघात चर्चा सुरू आहे.

या पोटनिवडणुकीत पतंगराव कदम यांचे पुत्र व युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम काँग्रेसचे अधिकृत उमेदवार असणार आहेत. भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख किंवा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख या दोघांपैकी एक कोणीही विश्वजित कदम यांच्याविरोधात मैदानात उतरेल. पण पक्षादेश काय येणार, यावर त्यांच्या उमेदवारीचा निर्णय निश्चित होईल असे समजते. दरम्यान, पोटनिवडणूक न लढविण्याचा भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीचा निर्णय झाल्यास, कोणी तरी अपक्ष उमेदवार केवळ प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी मैदानात उतरेल, अशीही शक्यता व्यक्त होत आहे.

पलूस-कडेगाव मतदारसंघात आजवर कडवा राजकीय सत्तासंघर्ष झाला असला तरी, येथील कदम-देशमुख घराण्यातील नेत्यांनी विधायक दृष्टिकोनातून विकास कामांसाठी मात्र समन्वय कायम ठेवला. विधायक कामातून तसेच साखर कारखाने, सूतगिरण्या, रोजगार निर्मितीच्या माध्यमातून दोन्ही बाजूंनी बेरजेचे राजकारण होत गेले. जुना भिलवडी-वांगी आणि सध्याच्या कडेगाव-पलूस मतदारसंघात पतंगराव कदम यांनी एकंदरीत सहा निवडणुका जिंकल्या, तर १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत संपतराव देशमुख यांनी, तर त्यानंतरच्या पोटनिवडणुकीत पृथ्वीराज देशमुख यांनी पतंगराव कदम यांना पराभवाचा धक्का दिला होता. आता आगामी पोटनिवडणुकीत चित्र कसे असणार, याबाबत मात्र मतदारसंघात उलटसुलट चर्चा सुरू आहे.

ज्यांनी या मतदारसंघाचे जवळपास ३० वर्षे आमदार आणि राज्याच्या मंत्रिमंडळात २० वर्षे विविध खात्यांचे मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळत कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविला, अशा पतंगराव कदम यांचा वारसा चालविण्याचे आव्हान घेऊन त्यांचे पुत्र विश्वजित कदम यांची वाटचाल सुरू राहणार आहे.

पोटनिवडणूक : मे महिन्यात शक्य
पलूस-कडेगाव मतदारसंघात सर्वाधिक विकसनशील आणि संवेदनशील राजकारण होते, असे म्हटले जाते. या मतदारसंघातील कदम-देशमुख घराण्यातील राजकीय सत्तासंघर्ष सर्वश्रुत आहे. परंतु ९ मार्च २०१८ रोजी या मतदारसंघाचे आमदार पतंगराव कदम यांचे निधन झाले. कदम यांच्या निधनाने येथे दु:खाचे सावट कायम असतानाच, त्यांच्या रिक्त झालेल्या जागी आता मेमध्ये पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे.

Web Title: Vishwajit's new innings start, another chapter of Kathgaon-Palus politics; Attention to opponents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.