‘लोकमत’तर्फे सांगलीत गुरूवारी विश्वंभर चौधरी यांचे व्याख्यान

By admin | Published: February 15, 2016 11:36 PM2016-02-15T23:36:04+5:302016-02-16T00:13:49+5:30

वर्धापनदिनी कार्यक्रम : स्मार्ट सांगलीसाठी मिळणार नवा मंत्र

Vishwambhar Chaudhary's lecture by 'Lokmat' on Thursday in Sangli | ‘लोकमत’तर्फे सांगलीत गुरूवारी विश्वंभर चौधरी यांचे व्याख्यान

‘लोकमत’तर्फे सांगलीत गुरूवारी विश्वंभर चौधरी यांचे व्याख्यान

Next

सांगली : ‘लोकमत’च्या सतराव्या वर्धापनदिना-निमित्त सांगलीत येत्या १८ फेब्रुवारीरोजी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, पर्यावरणतज्ज्ञ डॉ. विश्वंभर चौधरी यांचे ‘स्मार्ट सिटीची संकल्पना आणि विकासाचे प्रयत्न’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. यानिमित्त चौधरी यांचे विचार ऐकण्याची संधी जिल्ह्यातील नागरिकांना मिळणार आहे.
सांगलीच्या माधवनगर रस्त्यावरील डेक्कन मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनच्या सभागृहात गुरुवार, १८ फेब्रुवारीस सायंकाळी पाच वाजता त्यांचे व्याख्यान होणार आहे. पर्यावरणशास्त्रात डॉक्टरेट मिळविणाऱ्या चौधरी यांनी समाजकारण आणि राजकारण या विषयावरही विपुल लेखन केले आहे. राज्यभर त्यांनी या विषयावर मतेही मांडली आहेत. त्यामुळे पर्यावरणासह विविध क्षेत्रात सांगलीच्या स्मार्टपणाला अस्तित्वात आणण्यासाठी आवश्यक असणारा मंत्रही ते यानिमित्ताने देणार आहेत.
प्रस्थापित राजकारण्यांच्या पर्यावरणविरोधी, समाजविरोधी धोरणांना विरोध करताना, प्रबोधनाला चळवळीचे बळ देऊन गेल्या अनेक वर्षांपासून विश्वंभर चौधरी नावाचा लढवय्या महाराष्ट्राच्या राजकारणात संघर्ष करीत आहे. परिवर्तनाच्या वाऱ्याला वादळाचे स्वरूप देऊन पर्यावरण संवर्धनासह, पर्यावरणाइतकेच स्वच्छ राजकारण आणि समाजकारण अस्तित्वात आणण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले. ते स्वप्न प्रत्यक्ष साकारण्यासाठी त्यांची वाटचाल सुरू आहे.
केवळ प्रबोधन करून परिवर्तनाचे स्वप्न साकारता येत नसल्याने, एक मोठी चळवळ उभारून सातत्याने त्यासाठी धडपडणारे कार्यकर्ते म्हणून पर्यावरणवादी विश्वंभर चौधरी यांची ओळख देशभर आहे. पर्यावरणासह भारतीय राजकारणाचा बारकाईने अभ्यास करून त्याचे विश्लेषण करण्याची हातोटीही त्यांच्याकडे असल्याने, राजकीय विश्लेषक म्हणून जनमानसात त्यांनी वेगळी छाप पाडली आहे. पर्यावरणवादी कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय विश्लेषक, अभ्यासक म्हणून ते महाराष्ट्राला परिचित आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Vishwambhar Chaudhary's lecture by 'Lokmat' on Thursday in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.