विश्वास नांगरे-पाटील बोलतोय; तक्रारींची दाखवली भीती, सांगलीतील महिला डॉक्टरला घातला साडेपंधरा लाखांचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 12:59 PM2024-08-19T12:59:22+5:302024-08-19T12:59:52+5:30
सांगली : बेकायदेशीर संदेश, मनी लाँड्रिंग व गॅम्बलिंगच्या तक्रारी आल्याची भीती घालून सांगलीतील महिला डॉ. शीतल संजय पाटील (वय ...
सांगली : बेकायदेशीर संदेश, मनी लाँड्रिंग व गॅम्बलिंगच्या तक्रारी आल्याची भीती घालून सांगलीतील महिला डॉ. शीतल संजय पाटील (वय ५७, रा. मारुती चौक, गावभाग, सांगली) यांच्याकडून तब्बल १५ लाख ५० हजार रुपये उकळल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी सुरेशकुमार दास, हेमराज कोळी आणि विश्वास नांगरे-पाटील नावाने बोलणारी व्यक्ती, अशा तिघांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
संशयित सुरेशकुमार दास नामक व्यक्तीने डॉ. शीतल पाटील यांच्याशी दहा दिवसांपूर्वी मोबाइलवरून संपर्क साधला. डॉ. पाटील यांच्याविरोधात मनी लाँड्रिंग, गॅम्बलिंग आणि बेकायदेशीर मेसेजच्या सतराहून अधिक तक्रारी आल्या असून, मुंबई येथील टिळकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याचे सांगितले. पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक हेमराज कोळी हे तपास करीत असल्याची खोटी माहिती दिली.
याप्रकरणात तुमचा संबंध नसल्याचे सिद्ध करायचे असेल तर बँक खात्यावरून पैसे पाठवावे लागतील. आरबीआयच्या नियमानुसार आम्ही माहिती घेत आहोत, असे सांगून संशयित हेमराज कोळी याने डॉ. पाटील यांच्या मोबाइलवर व्हिडीओ कॉल केला. त्यांना पोलिस असल्याचे ओळखपत्र, न्यायालयाचे अटक वॉरंट, ईडीची आणि आरबीआयची बनावट नोटीस, अशी कागदपत्रे पाठवून दिली. तसेच अटक करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले.
यावेळी विश्वास नांगरे-पाटील बोलत आहेत, असे भासवून एका भामट्याने डॉ. पाटील यांच्याशी संभाषण केले. यामुळे घाबरलेल्या डॉ. पाटील यांनी ५ लाख रुपये स्वत: त्या खात्यातून आरोपीच्या बंधन बँकेतील खात्यावर पाठविले. तसेच दि. १२ रोजी बँकेतून सोने तारण ठेवून कर्ज काढलेले १० लाख ५० हजार रुपये हेमराज कोळी यांनी सांगितलेल्या सारस्वत बँकेच्या खात्यात जमा केले. हा प्रकार दि. ७ ते १६ ऑगस्ट या कालावधीत हा घडला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच डॉ. पाटील यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.