इस्लामपूरच्या ग्रंथप्रेमींची जवानांना पुस्तके भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 01:57 PM2017-10-25T13:57:36+5:302017-10-25T14:04:37+5:30
काश्मीर येथे सीमेवर देशाचे संरक्षण करण्यासाठी अहोरात्र कार्यरत असणाºया जवानांच्या मनाला विरंगुळा देण्यासाठी आणि मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी इस्लामपूर येथील ग्रंथप्रेमींनी लेह लडाख आणि जम्मू-काश्मीरमधील जवानांना २०० पुस्तके भेट देत, अनोख्या पध्दतीने दिवाळी साजरी केली.
इस्लामपूर ,दि. २५ : काश्मीर येथे सीमेवर देशाचे संरक्षण करण्यासाठी अहोरात्र कार्यरत असणाऱ्या जवानांच्या मनाला विरंगुळा देण्यासाठी आणि मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी इस्लामपूर येथील ग्रंथप्रेमींनी लेह लडाख आणि जम्मू-काश्मीरमधील जवानांना २०० पुस्तके भेट देत, अनोख्या पध्दतीने दिवाळी साजरी केली.
ग्रंथमित्र सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली लेखक डॉ. प्रा. संजय थोरात यांच्या पुढाकाराने अवघ्या दोन दिवसात दोनशे पुस्तके जमा करून, सुटीवर आलेल्या जवानांकडे ती सुपूर्द केली. लेह लडाख येथे असणारे अविनाश महाडिक (नेवरी, ता. कडेगाव) आणि काश्मीरला असणारे अक्षय खंजिरे (नांदणी) या दोन्ही लष्करी जवानांकडे एका समारंभात ही पुस्तके दिली.
इस्लामपूरच्या ग्रंथप्रेमींनी एकत्र येऊन ही पुस्तके जमा केली. यामध्ये निवृत्त प्राचार्य विश्वास सायनाकर, संजय बनसोडे, दीपक कोठावळे, सुखदेव माळी, युवराज निकम, अरुण कांबळे, विक्रम घाडगे, प्रा. दीपक स्वामी, राम घुले, प्राचार्य अंकुश बेलवटकर, नितीन शिंदे, विजय गायकवाड, अभियंता सुनील पाटील, वर्षाराणी मोहिते यांनी पुस्तके दिली.
यावेळी सुनील चव्हाण म्हणाले, आजवर लाखभर पुस्तके उपलब्ध करून सीमाभागातील व गडचिरोली जिल्ह्यातील ग्रंथालयांना भेट दिली. पण दिवाळीच्या निमित्ताने लष्करी जवानांच्या माध्यमातून आपल्या पुस्तकांचा समावेश जम्मू-काश्मीरमधील लष्करी ग्रंथालयात होत आहे.
थेट सीमेवर असणाऱ्या मराठी बांधवांना आपल्या तणावातून मुक्ती मिळविण्यासाठी या पुस्तकांचा उपयोग होईल. जवान अविनाश महाडिक म्हणाले, आमची यंदाची दिवाळी कायम स्मरणात राहील. बाबासाहेब परीट, दीपक पवार, प्रा. के. डी. कुरुंदवाडे, सतीश चौगुले, शामराव गावडे यावेळी उपस्थित होते. विनोद मोहिते यांनी आभार मानले.