विट्यात मुख्याधिकारी उतरले रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:26 AM2021-04-22T04:26:14+5:302021-04-22T04:26:14+5:30
ओळ : विटा येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी अतुल पाटील यांनी बुधवारी प्रशासनाच्या उपाययाेजनांचा प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून आढावा घेतला. लोकमत ...
ओळ :
विटा येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी अतुल पाटील यांनी बुधवारी प्रशासनाच्या उपाययाेजनांचा प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून आढावा घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : विटा शहरात कोरोना रुग्णांच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी तसेच शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करण्यासाठी विटा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अतुल पाटील बुधवारी रस्त्यावर उतरले. त्यांनी शहरात होम आयसोलेशन असलेल्या रुग्णांची विचारपूस केली. त्यांना घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन करीत, व्यापारी पेठेतील अत्यावश्यक वस्तूंची दुकाने ७ ते ११ या वेळेत नियमांचे काटेकोरपणे पालन करीत आहेत का, याचीही पाहणी केली.
अतुल पाटील म्हणाले, गेल्या पंधरा दिवसात विट्यात कोरोनाने उग्ररूप धारण केले आहे. या आजाराने अनेक लोकांचे जीवनमान खालावले आहे. परंतु विटा शहरातील लोकांवर अशी वेळ येऊ नये, यासाठी शहरामध्ये विविध माध्यमातून जनजागृती सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून नगरपरिषदेची सर्व टीम विटा शहरामध्ये फिरून रुग्णांची विचारपूस करीत आहे. त्यांना घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन करीत आहे. त्यांना काही अडचण आल्यास नगरपरिषदेशी संपर्क साधावा. त्याबाबत सर्वतोपरी मदत केली जाईल.
यावेळी पाटील यांनी शासनाने ठरवून दिलेल्या ७ ते ११ या वेळेनुसार दुकाने सुरू ठेवण्याचे आवाहन शहरातील सर्व दुकानदारांना केले. तसेच भाजी मार्केटमध्ये भेट देऊन भाजीविक्रेते, व्यापारी, दुकानदार यांना शासनाने ठरवून दिलेल्या आदेशाचे पालन करण्यास सांगितले. जे लोक होम क्वारंटाईन असूनही घरातून बाहेर फिरतात, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश मुख्याधिकारी पाटील यांनी भरारी पथकाला दिले.
यावेळी कार्यालयीन अधीक्षक बाजीराव जाधव, आरोग्य निरीक्षक आनंदा सावंत, सहायक नगररचनाकार अनिकेत महाजन, अतिक्रमण विभाग प्रमुख नारायण शितोळे यांच्यासह भरारी पथकातील कर्मचारी उपस्थित होते.