विटा नगराध्यक्षपद; इच्छुकांची मांदियाळी

By Admin | Published: July 12, 2014 12:16 AM2014-07-12T00:16:31+5:302014-07-12T00:19:13+5:30

सोमवारी निवड : भावी नगराध्यक्षांचे देव पाण्यात

Vita municipal councilor; Minded | विटा नगराध्यक्षपद; इच्छुकांची मांदियाळी

विटा नगराध्यक्षपद; इच्छुकांची मांदियाळी

googlenewsNext

दिलीप मोहिते ल्ल विटा, विट्याच्या महिला नगराध्यक्षपदाचा अडीच वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर आता सर्वसाधारण प्रवर्गातील नगराध्यक्षाची निवड होणार असल्याने या पदासाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवले आहेत.
इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने सत्ताधारी गटाचे सर्वेसर्वा आमदार सदाशिवराव पाटील यांच्यासमोर नगराध्यक्ष निवडीसाठी पेच निर्माण झाला आहे. तरीही गेल्या ४५ वर्षांपासून विटा पालिकेत एकहाती सत्ता काबीज करण्यात यशस्वी झालेला सत्ताधारी गट समाधानकारक तोडगा काढेल, असा विश्वास इच्छुकांनी व्यक्त केला आहे.
एकेकाळी विळ्या-भोपळ्याचे सख्य असलेले कॉँग्रेसचे आ. पाटील व विरोधी विकास आघाडीचे नेते अशोकराव गायकवाड यांनी २०११ च्या पालिकेच्या निवडणुकीत एकत्रित येऊन पालिकेवर झेंडा फडकविला. निवडणुकीनंतर पहिली अडीच वर्षे नगराध्यक्षपद महिला उमेदवारासाठी आरक्षित राहिले. आता सर्वसाधारण प्रवर्गासाठी नगराध्यक्षपद खुले झाल्याने चुरस निर्माण झाली आहे. या पदासाठी सध्या पक्षप्रतोद वैभव पाटील, नंदकुमार पाटील, अ‍ॅड. सचिन जाधव व कृष्णत गायकवाड इच्छुक आहेत. पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्यासमवेत आ. पाटील यांच्यात मुंबई येथे झालेल्या बैठकीत, पुढील कालावधित नंदकुमार पाटील यांना संधी देण्याबाबत चर्चा झाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे प्रमुख दावेदार म्हणून पाटील यांनी हक्क सांगितला आहे.
आ. पाटील व गायकवाड यांची युती झाल्यानंतर एका कार्यक्रमात आ. पाटील यांनी, पुढील काळात गायकवाड समर्थकांना संधी देण्याबाबत शब्द दिला होता. त्या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्यात गायकवाड समर्थक कार्यकर्त्यांनी आ. पाटील यांच्यासमोर शक्तिप्रदर्शन करून कृष्णत गायकवाड यांना संधी देण्याबाबत साकडे घातले होते. मात्र त्यानंतर काही दिवसात पालिका सभागृहात गायकवाड समर्थक नगरसेवकांनी सत्ताधारी मंडळींनी मांडलेल्या ठरावाविरोधात मतदान केल्याने गायकवाड समर्थकांबाबत सध्या पालिकेतील वातावरण गढूळ झाल्याचे दिसून येते. त्यामुळे गायकवाड समर्थकांवर सत्ताधारी मंडळी नाराज असल्याने आ. पाटील काय निर्णय घेणार, याकडे विटेकरांचे लक्ष लागले आहे. त्यातच पक्षप्रतोद वैभव पाटील, अ‍ॅड. सचिन जाधव यांनीसुध्दा नगराध्यक्ष पदासाठी मैदानात उतरून शड्डू ठोकला आहे. त्यामुळे इच्छुकांची गर्दी वाढली असून याबाबतचा निर्णय घेताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. सध्या विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. त्यामुळे आ. पाटील नगराध्यक्षपदावर कोणाला संधी देतात, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

Web Title: Vita municipal councilor; Minded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.