कोरोनाची तिसरी लाट थोपविण्यासाठी विटा नगरपालिका सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:20 AM2021-06-05T04:20:41+5:302021-06-05T04:20:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क विटा : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेपासून लहान मुलांना वाचविण्यासाठी विटा नगरपालिका प्रशासन आतापासूनच योग्य ती खबरदारी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेपासून लहान मुलांना वाचविण्यासाठी विटा नगरपालिका प्रशासन आतापासूनच योग्य ती खबरदारी घेत आहे. त्यासाठी शहरातील बालरोगतज्ज्ञ डॉक्टरांची महत्त्वाची भूमिका आहे. कोरोनाच्या या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी बालरोगतज्ज्ञांनी सहकार्य करावे, असे आवाहन विटा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अतुल पाटील यांनी केले.
विटा नगरपालिकेच्या सभागृहात गुरुवारी कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेतून लहान मुलांचा संसर्ग रोखणे खबरदारी व उपाययोजनेसाठी माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार बालरोगतज्ज्ञांची कार्यशाळा झाली. यावेळी मुख्याधिकारी अतुल पाटील बोलत होते. या कार्यशाळेस बालरोगतज्ज्ञ डॉ.जे.एम. पवार, डॉ. दीपक शहा, डॉ.अजित शहा, डॉ. कुमार हजारे, डॉ. अमोल तारळेकर, डॉ. सुभाष वलेकर, डॉ. महेशकुमार हिंगमिरे यांच्यासह नगरसेवक किरण तारळेकर, आरोग्य सभापती दहावीर शितोळे, फिरोज तांबोळी, प्रशांत कांबळे, अविनाश चोथे सहभागी झाले होते.
आगामी काळामध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने त्यामध्ये लहान मुलांना धोका असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्या अनुषंगाने उपाययोजना व नियोजन करण्याबाबत कार्यशाळेत चर्चा झाली. या कार्यशाळेमध्ये बालरोगतज्ज्ञ डॉ. जे.एम. पवार यांनी मास्क व सॅनिटायझर वापरत असताना घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. सुशांत वलेकर यांनी लहान मुलांतील कोरोनाची लक्षणे व सौम्य लक्षणे याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. महेश हिंगमिरे यांनी कोरोनाकाळातील बालरुग्णाचा आहार याविषयी मार्गदर्शन केले. डॉ. कुमार हजारे यांनी बालरुग्णामधील लक्षणे ओळखून त्याच्या कोविड चाचण्या करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. डॉ. दीपक शहा यांनी बालरुग्णांमध्ये संसर्ग का वाढतो व तो कसा रोखायचा याबाबत मार्गदर्शन केले व पावसाळ्यातील साथरोगाचा प्रतिबंध करण्यासाठी नगरपरिषदेने योग्य ती उपाययोजना करावी, असे सूचित केले.
डॉ. अमोल तारळेकर यांनी बालकोविड रुग्णांची घ्यावयाची काळजी याबाबत, तर डॉ. अजित शहा यांनी कोरोनाकाळातील स्तनपान करताना मातांनी घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले.
माजी नगरसेवक प्रशांत कांबळे यांनी प्रास्ताविक व अनिल पवार यांनी सूत्रसंचालन केले. आरोग्य निरीक्षक आनंदा सावंत यांनी आभार मानले.